Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक यशस्वी खेळी करून आपले सदस्य निवडल्यानंतर सभापतिपदांच्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदारांनी (Sunil Kedar) राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) एकच सभापतीपद दिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केलेले, ज्येष्ठ सदस्य आणि नेत्यांच्या पुत्रांना सभापतीपदांपासून लांब ठेवत आश्चर्यकारकपणे केदारांनी नवख्यांच्या हाती सभापतीपदांची धुरा दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे सुपुत्र सलील (Saleel Deshmukh) आणि माजी मंत्री रमेश यांचे पुत्र गुड्डू बंग यांना सभापती म्हणून बढती दिली जाईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण केदारांनी नवख्यांना संधी देत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. सत्ता स्थापनेसाठी इतरांची गरज नाही. असे असले तरी भाजपतर्फे फोडाफोडीचा धोका असल्याने त्यांनी राष्ट्रवादीलाही सोबत ठेवले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्यावतीने उपाध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र, केदारांनी तो फेटाळून लावला.
चर्चेत असणारी नावे डावलली
राष्ट्रवादीने दोन सभापती देण्याची मागणी केली होती. पण केदारांनी एका जागेवर बोळवण केली. मागील निवडणुकीत तत्कालीन महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांना सभापतिपद देण्यास राष्ट्रवादी इच्छुक नव्हती़. गुड्डू बंग आणि सलील देशमुख यांना पदे मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह होता. काँग्रेसने बोढारेंना बळ देत दोन्ही नेत्यांना शह दिला. यावेळी भिष्णूर सर्कलचे बाळू जोध यांना संधी दिली़. जोध यांच्या विरोधात आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजप उमेदवाराला समर्थन दिले होते. जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ सदस्य आणि अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान बंडखोरी केलेल्यांना कुठलेही स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, चर्चेत असणारी नावे डावलली गेली आणि आश्चर्यकारकरीत्या नवख्यांच्या हाती विषय समितीच्या सभापतिपदाची सूत्रे देण्यात आली आहे.
बंडखोर सभापतीपदापासून कोसो दूर
रामटेक मतदारसंघातून शांता कुमरे, दुधाराम सव्वालाखे हे दावेदार होते मात्र, स्थानिक रामटेक तालुक्यातील दोघांनाही डावलण्यात आले. पारशिवनीला हा मान देण्यात आला़. माजी मंत्री केदारांचे अत्यंत विश्वासू राजू कुसुंबे यांच्या गळ्यात माळ पडली. कामठी मतदारसंघातील ज्येष्ठ सदस्य व बंडखोर नाना कंभाले यांना सभापतिपदापासून कोसो दूर ठेवले़. सुरेश भोयर गटाचे दिनेश ढोले स्पर्धेत होते़. त्यांना बाजूला सारत अवंतिका लेकुरवाळेंना संधी देण्यात आली़. उमरेड मतदारसंघात अभ्यासू व ज्येष्ठ सदस्य अरुण हटवार शर्यतीत होते. परंतु, युवा सदस्य मिलिंद सुटे यांच्या गळ्यात अचानक सभापतीपदाची माळ पडली़. ज्येष्ठ सदस्यांना डावलण्यात आल्याने कालपासून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
महत्त्वाची बातमी