Nagpur News : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या (Nagpur ZP Election Update) निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या सदस्यांना कॉंग्रेसने सभापतीपदाच्या निवडणुकीत डच्चू दिला आहे. बंडखोर सदस्य नाना कंभाले कॉंग्रेसच्या कॅम्पमध्ये भेट देऊन आले होते. मात्र, बंडखोरीचा शिक्का लागलेल्यांना संधी द्यायचीच नाही, अशी स्पष्ट भूमिका नेत्यांनी घेतल्याचे दिसून आले आणि निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला.


कॉंग्रेसचे राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळू उर्फ प्रवीण जोध विजयी झाले आहेत. उमेदवारी संदर्भात कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर सभापतीपदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. 

उमेदवारी जाहीर होताच अनेकांना बसला धक्का


ही नावे जाहीर करताच काहींना धक्का बसला. रामटेक विधानसभा मतदारसंघातून दुधाराम सव्वालाखे आणि शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा असताना राजकुमार कुसुंबे यांचे नाव जाहीर केले. ते सुनील केदार यांचे विश्वासू मानले जातात. मिलिंद सुटे यांच्या नावाला उमरेडमधील काही नेत्यांनी विरोध केल्याची माहिती पण केदार आणि माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची बाजू घेतल्याचे त्यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना 38 मते मिळाली तर भाजपच्या उमेदवारांना केवळ 13 मतांवर समाधान मानावे लागले.


ऐनवेळी घेतला निवडणुकीचा निर्णय


भाजपच्या बैठकीत निवडणूक लढावे की नाही, याबाबत चर्चा झाली. कॉंग्रेस सदस्यांची साथ मिळणार नसल्याने ही निवडणूक न लढण्याबाबत काहींचा सूर होता. निवडणूक न लढल्यास वेगळा संदेश जाईल, असाही सूर निघाल्याने ऐनवेळी भाजपने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. विरोध पक्षनेते अनुपस्थित असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला.


कंभाले, कवरे, झाडेसह सहा अनुपस्थित, मानकर तटस्थ


अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवणारे नाना कंभाले व प्रीतम कवरे हे अनुपस्थित होते. त्याच प्रमाणे शिवसेना (शिंदे समर्थक) सदस्य संजय झाडे यांनी सुद्धा येणे टाळले. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी भाजपचे संख्याबळ कमी केले. त्याचप्रमाणे विरोध पक्षनेते आतिश उमरे, राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व कॉंग्रेस सदस्य शंकर डडमलही अनुपस्तित होते. मागील निवडणुकीत बंडखोरांना मतदान करणाऱ्या मेघा मानकर यांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.


सुप्रिया सुळे यांचा थेट केदारांना फोन


जिल्हा परिषदेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी सभापती देण्यास कॉंग्रेसकडून सातत्याने नकार दिला जात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट आमदार सुनील केदार यांना फोन लावला. त्यानंतर राष्ट्रवादीचे बाळू जोध यांचे नाव सभापतीपदासाठी जाहीर करण्यात असल्याची चर्चा आहे.


उमेदवार व त्यांना मिळालेली मते


शिक्षण व अर्थ सभापती (संभाव्य)


राजकुमार कुसुंबे (कॉंग्रेस) - 38
प्रमिला दंडारे (भाजप) - 13


कृषी समिती (संभाव्य)


बाळू जोध (राष्ट्रवादी) - 38
सतीश दंडारे (भाजप)-13


समाजकल्याण समिती
मिलिंद सुटे (कॉंग्रेस) - 38
सुभाष गुजरकर - 13


महिला व बालकल्याण समिती


अवंतिका लेकुरवाले (कॉंग्रेस) - 38
पुष्पा चाफले (भाजप) - 13


महत्त्वाची बातमी


Bharat Jodo: 'भारत जोडो' यात्रेत काँग्रेस नेते नितीन राऊत जखमी; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर