Ravi Rana Vs Bacchu Kadu: गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवीरांना यांच्यात वाद होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपला होता, असं दोघांकडून जाहीर करण्यात आलं होत. मात्र आता या दोघातील हा वाद पुन्हा वाढताना दिसत आहे. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, बच्चू कडू आणि रवी राणा दोघेही समजदार आहेत. त्यांना भडकवण्याचं काम कोणीतरी करत आहे. या वादातून बाहेर पडावं, अशी विनंतीही या दोन्ही आमदारांना बावनकुळे यांनी केली आहे. 


चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, अमरावती साठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. कुठलाही वाद होऊ नये लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून 80 महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. हे दोघेही राज्य सरकारचे सहयोगी आहेत. या वादावर पडदा पडावा, अशी आमची विनंती आहे. 


भाजपच्या बैठकीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमच्या बैठका सातत्याने होत असतात राज्य सरकारमधील मंत्री आणि संघटनेतील पदाधिकारी यांची बैठक आहे. संघटन आणि सरकार याच्यात समन्वय आणि लोकांपर्यंत निर्णय पोहोचवण्यासाठी बैठक आहे. सरकारने घेतलेला निर्णय ही संघटना लोकांपर्यंत पोहोचत असते. येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत लोकसभा प्रवास योजना विधानसभा प्रभास योजना या अनेक विषयाला धरून ही बैठक आहे संघटना या विषयावर आज चर्चा होईल. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप युती करून लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढणार आहोत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा युतीच्या 200 हून अधिक जागा जिंकून आणण्याची आमची योजना आहे, असं ते म्हणाले आहेत.


आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, लोकसभेसाठी 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाच कोटी लाभार्थी हे मोदी यांच्या योजनेचे लाभार्थी आहेत. दोन कोटी लाभार्थी यांनी धन्यवाद मोदीजी अशा पद्धतीचे स्वतःच्या अक्षरात लिहून पोस्टकार्ड पाठवत आहेत. मोदीजी यांना दोन कोटी पोस्ट पाठवण्याची व्यवस्था केली आहे. 


प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सेनेला घरघर लागल्यामुळे ते कोणासोबतही मतांसाठी जाऊ शकतात. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र बसल्यास काही नवल नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे बॅट्समन आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, आम्ही नोटासाठी मतदान करा असं कुठेही आवाहन केलं नाही. आम्ही असे धंदे करत नाही.