Beed Hingoli Doctor News: आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde) यांनी दिवाळीच्या सुट्टी मध्येच बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी अनेक डॉक्टर हे प्रतिनियुक्त असून काही डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याने ते जिल्हा रुग्णालयात उपस्थित नसल्याचं निदर्शनास आलं. याच डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंडे यांनी दिले होते. ही परिस्थिती फक्त एक त्या बीड जिल्ह्यात नसून हिंगोलीमध्ये (Beed And Hingoli Updates) देखील असाच प्रकार समोर आला आहे.
खाजगी दवाखाने असलेल्या डॉक्टरांना नोटिसा
शासकीय सेवेत असताना राज्यातील अनेक डॉक्टर स्वतःचे दवाखाने चालवत आहेत त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच प्रतिनियुक्त डॉक्टरांच्या नियुक्ती रद्द केल्या असून, खाजगी दवाखाने असलेल्या डॉक्टरांना देखील नोटिसा बजावल्या आहेत. तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्यास या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं डॉक्टर साबळे यांनी सांगितलं आहे.
डॉक्टरांचे बीड शहरातच आलिशान खाजगी दवाखाने
बीड जिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टरांचे बीड शहरातच आलिशान असे खाजगी दवाखाने आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिनियुक्त्या जिल्हा रुग्णालयात करून घेतल्या होत्या, त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सेवा कोलमडल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या विरोधात आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
जिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर खाजगी दाखण्यात प्रॅक्टिस करत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्यात जावं लागतं. त्यामुळे अनेक रुग्णांना मोफत उपचार मिळण्याऐवजी पैसे देऊनच उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे या आदेशानंतर या डॉक्टरांनी जर आपापल्या मुख्यालयात राहूनच सेवा दिली तर ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होईल.
शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस न करण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र यातूनही पळवाट काढून बहुतांश डॉक्टर हे शासकीय रुग्णालयातील सेवेकडे दुर्लक्ष करून आपल्या खाजगी दवाखान्यातच रुग्णावर उपचार करत असतात. तर दुसरीकडे शहरात राहणारे अनेक डॉक्टर यांच्या नियुक्ती ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये असतानाही आपल्या कामात कूचराई करत ते जिल्हा रुग्णालयातच प्रतिनियुक्ती करून घेतात त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई होणं गरजेचं आहे.