Smruti Irani on Paid Period Leave : महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही? यावर बुधवारी (13 डिसेंबर) संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी उत्तर देत हा विचार फेटाळून लावला आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, त्यामुळे सरकार अशा कोणत्याही भरपगारी रजेचा विचार करत नसल्याचं स्मृती इराणींनी सांगितलं आहे.
'मासिक पाळीकडे अपंगत्व म्हणून पाहू नये'
राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत भरपगारी मासिक पाळी रजेबाबत प्रश्न विचारला होता. विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणी उत्तर देत होत्या, त्यावेळी त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केलं. "मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक भाग आहे, हे कोणतंही अपंगत्व नाही. मासिक पाळीकडे अपंगत्व म्हणून पाहू नये. महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल. मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असल्यामुळे महिलांना समान संधी नाकारल्या जातात, असं म्हणून बाऊ करु नये." असं स्मृती इराणी म्हणाल्या.
दरम्यान, भरपगारी मासिक पाळी रजेबाबत बोलणारे मनोज कुमार झा हे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधातील आक्रमकतेसाठी ओळखले जातात.
भारतात मासिक पाळी रजेवरुन वाद
मासिक पाळीत भरपगारी रजा द्यायची की नाही यावरून भारतात बराच वाद सुरू आहे. स्पेनमध्ये महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या वेदना होत असताना सुट्टी दिली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. असं करणारा स्पेन हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे. पण भारतामध्ये मासिक पाळी रजेबाबत सरकारचा सध्या तरी कोणताही हेतू नाही. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी 8 डिसेंबरला याबाबत प्रश्न विचारला असता सरकारने त्यांनाही तेच उत्तर दिलं होतं.
यापूर्वी केलं होतं समर्थन
ऑक्टोबरमध्ये मात्र सरकारने मासिक पाळीच्या स्वच्छता धोरणाचा मसुदा जारी केला, ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या काळात सुट्टीच्या तरतुदींचं समर्थन करण्यात आलं होतं. “शाळा, कॉलेज आणि कार्यालयांतील सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी, कर्मचार्यांच्या विविध गरजा ओळखण्यासाठी आणि सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि उत्पादकतेला समर्थन देणारं वातावरण तयार करणं गरजेचं आहे. मासिक पाळी दरम्यान व्यक्तींच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिक कामकाजाच्या व्यवस्थेसारखी तरतूद असावी, यामध्ये घरातून काम (Work From Home) किंवा सपोर्ट रजा (Paid Period Leave) दिली जावी,” असं मसुद्यात नमूद केलं होतं.
हेही वाचा: