Silent Heart Attack Symptoms : आजकाल एकदम निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीचाही अचानक मृत्यू होतो, त्यामागे सायलेंट हार्ट अटॅक (Silent Heart Attack) कारणीभूत असू शकतो. सायलेंट हार्ट अटॅक अतिशय शांतपणे येतो आणि बसल्या जागी व्यक्तीचा जीव घेतो. सायलेंट हार्ट अटॅक येणार आहे हे सांगणारी कोणतीही चाचणी (Test) नाही. लक्षणं ओळखून तुम्ही वेळोवेळी डॉक्टरकडे जावं. इलेक्ट्रोकार्डियोग्राम किंवा इकोकार्डियोग्राम चाचणी हा सायलेंट हार्ट अटॅक ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं
सायलेंट हार्ट अटॅक हा असा हृदयविकाराचा झटका आहे, ज्याची लक्षणं फार कमी असतात. जरी लक्षणे आढळली तरी त्याचा हृदयविकाराशी संबंध लागत नाही. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये ना छातीत दुखतं, ना श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. सामान्य हृदयविकाराच्या झटक्यात मात्र हा त्रास जाणवतो.
सायलेंट हार्ट अटॅक कोणाला येतो?
सायलेंट हार्ट अटॅकचे जोखीम घटक हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच असतात. वय, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास (Family Heart Attack History), उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, व्यायामाचा अभाव, तंबाखू सेवन इ. घटक सायलेंट हार्ट अटॅकला कारणीभूत ठरतात.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं
विनाकारण थकवा जाणवणे
हलकं काम करत असतानाही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ते सायलेंट हार्ट अटॅकचं सौम्य लक्षण असू शकतं. हृदयाच्या खराब आरोग्यामुळे शरीराला पुरेशी उर्जा मिळत नाही, त्यामुळे अनेकदा थकवा जाणवतो.
धाप लागणे
ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या आवश्यक कार्ये करत असताना अचानक धाप लागते, त्यांनी सायलेंट हार्ट अटॅकच्या शक्यतेबद्दल सावध असलं पाहिजे.
शरीराच्या वरच्या भागात अस्वस्थता
हात, मान, जबडा किंवा पाठ यासह शरीराच्या वरच्या भागामध्ये अस्वस्थता हे सायलेंट हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. ही अस्वस्थता सौम्य आणि अधूनमधून असू शकते.
मळमळ आणि चक्कर येणे
सतत मळमळ, कधीकधी सौम्य डोकेदुखी किंवा चक्कर येणे हे देखील एक लक्षण आहे, यावरून हृदय नीट काम करत नसल्याचं दिसून येतं.
खूप घाम येणे
जास्त घाम येणे हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्येचं लक्षण असू शकतं. घाम येणं हा हृदयावरील ताणामुळे आलेला शरीराचा प्रतिसाद असू शकतो. जर तुम्हाला विनाकारण घाम येत असेल तर लगेच डॉक्टरकडे जा.
हेही वाचा:
Winter Foods : थंडीत आवडीने खाल्ले जातात 'हे' 5 स्ट्रीट फूड; यातील तुमचा आवडता पदार्थ कोणता?