छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना (Jalna) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. यातूनच टोपे यांची गाडीची तोडफोड करण्यात आली होती. सोबतच बबनराव लोणीकर यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते. दरम्यान, आता या दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडीओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्यात एक आमदार दुसऱ्या आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या तथाकथित ऑडिओची क्लिपची 'एबीपी माझा' पुष्टी करत नाही. 


जालना जिल्ह्यातील दोन आमदारांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमामध्ये व्हायरल होत आहे. ज्यात, एक आमदार दुसऱ्या आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि दुसरे आमदार राजेश टोपे यांच्या संभाषणाची ही तथाकथित ऑडीओ क्लिप असल्याचे बोलले जात आहे. जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादातून या दोन्ही आमदारांचा वाद असल्याचे बोलले जात आहे. बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर याना उपाध्यक्ष करण्यावरून हा वाद पाहायला मिळतोय. मात्र, राजकीय वर्तुळात या ऑडीओ क्लिपची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक


याच वादातून माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून घोषणाबाजी केली होती. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली होती. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या होत्या, तसेच त्यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वादातून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


लोणीकरांच्या घरावर दगडफेक... 


मागील आठवड्यात जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. यावरून लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यावर संध्याकाळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. अचानक आलेल्या अज्ञाताच्या घोळक्याने बबनराव लोणीकर आणि त्यांचे बंधू यांच्या घरावर दगडफेक केली होती. विशेष म्हणजे याचवेळी लोणीकर यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या राजेश टोपे यांच्या बंधूच्या घरावर देखील यावेळी दगडफेक करण्यात आली होती. 


राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर ऑडिओ क्लिप ( Rajesh Tope & Babanrao Lonikar Audio Clip) 



 


 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप