रत्नागिरी : लकी नंबर, लकी वस्तू, लकी व्यक्ती किंवा लकी ठिकाण अशी धारणा आपल्यापैकी अनेकांची असते. ती लकी गोष्ट मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील देखील असतात. या सर्व गोष्टींमध्ये राजकारणी, नेतेदेखील मागे नाहीत बरं का. कोकणातील अर्थात रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्यासाठी काही नेत्यांनी चक्क हॉटेलमध्ये लकी ठरणारे रूम्स बुक केले आहेत. अर्थात काहींना मनाप्रमाणे रूम्स मिळाल्या तर काहींना नाही अशी चर्चा आहे.


रत्नागिरी -सिंधुदुर्ग हा लोकसभेचा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो, पण आताही तो चर्चेत आलाय तो हॉटेलमधील लकी रूम्समुळे. आता हॉटेल्समधील रूम्स विविध पक्षांचे नेते आणि उमेदवार यांना लकी ठरणार का अशी चर्चा सध्या कोकणातील पारावर सुरू असून त्यावर आता गप्पांची मैफिल रंगली आहे. याचं कारण म्हणजे ठराविक एका हॉटेलमधील ठराविक अशी रूम आपल्यासाठी लकी ठरते अशी इथल्या नेत्यांची धारणा आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत लकी रूम्स बुक करण्यासाठी देखील या नेत्यांनी हात आखडता अजिबात घेतला नाही.


काहींना हे लकी रूम्स मिळाल्या तर काहींना दुसऱ्या रूम घ्याव्या लागल्या. लक्षणीय बाब म्हणजे काहींनी तर चार महिने अगोदरच या रूम्स बुक केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे याची चर्चा होणारच नाही असं होणं अगदी अशक्य. 


उदय सामंत यांचा सूट यंदा विनायक राऊत यांना


अर्थात आचारसंहिता असल्यामुळे शासकीय विश्रामगृहावर उतरण्यास राजकीय नेत्यांना बंदी आहे. परिणामी स्वाभाविकपणे त्याचा मोर्चा वळला तो हॉटेल्सकडे. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी शहरातील 'हॉटेल विवेक'मध्ये असलेला 202 नंबरचा सूट हा कायम उदय सामंत बुक करतात असं सांगितलं जातं. यावेळी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी तो नोव्हेंबरपासूनच बुक केलाय. त्यामुळे सामंत यांनी 302 नंबरचा सुट घेतला. 


निलेश राणेंच्या रूमवर नारायण उतरण्याची शक्यता


भाजपचे नेते निलेश राणे हॉटेल कार्निवलमध्ये 103 या रूम नंबरमध्ये राहतात. यावेळी त्या ठिकाणी नारायण राणे देखील उतरू शकतात असं सांगितलं जातंय. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हॉटेल मथुरामधील 203 नंबरचा सूट बुक केल्याची माहिती आहे. 


कुणाला लकी ठरणार, कुणाला घरचा रस्ता दाखवणार?


गावागातल्या पारांवर, शहरातल्या चौकांमध्ये या लकी हॉटेल्सची कुजबज रंगली असली तरी नेत्यांनी मात्र काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही असा पवित्रा घेत तोंडावर बोट आणि हाताची घडी अशी भूमिका घेतलीय. 
म्हणूनच आता या हॉटेल्समधली कोणती रूम कुणाला लकी ठरते आणि कुणाला या लकी हॉटेलमधून थेट घरचा रस्ता दाखवते हे 4 जून रोजी कळणार आहे.


ही बातमी वाचा: