Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी केली होती. मात्र ही जागा शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वाट्याला आली. शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 


यानंतर जे पी गावित यांनी एल्गार पुकारला आहे. नुकतीच त्यांनी दिंडोरी जाहीर सभा घेत थेट शरद पवारांनाच इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना बदला. नाहीतर तुमचा उमेदवार पडणारच, असा इशारा त्यांनी शरद पवारांना दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी दिंडोरीतील महत्वाच्या नेत्यांसोबत बैठकदेखील घेतली होती. 


दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार


त्यानंतरही जे पी गावित हे बंडखोरी करण्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार, असा इशारा जे पी गावितांनी दिला आहे. दिंडोरीचा शरद पवार गटाचा उमेदवार नवखा आहे, भाजपसमोर तो कच्चा पडू शकतो,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच जागावाटपात महाविकास आघाडीने माकपला विश्वासात न घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. आता एक-दोन दिवसात शरद पवारांसोबत माकप नेत्यांची होणार बैठक आहे. या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


दिंडोरीत माकपची मोठी ताकद


दरम्यान, माकपचे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी भाजपच्या (BJP) विरोधात सातत्याने लढा दिला आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. दिंडोरीत माकपची मोठी ताकद असल्याने लोकसभा निवडणुकीत दिंडोरीची जागा माकपला मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ती मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता नाराज गावित हे आता निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 


कोण आहेत जे पी गावित?


जे पी गावित हे सुरगाणा व कळवण येथून सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 साली जे पी गावित यांना महाराष्ट्र विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. जे पी गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. 


आणखी वाचा 


Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल