सिंधुदुर्ग : नारायण राणे (Narayan Rane) हे आक्रमक नेतृत्व आहे, कोकणचा वाघ म्हणून त्यांना ओळखलं जातं अशी स्तुतीसुमनं शिवसेना शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उधळली. राणेंवर व्यक्तिगत पातळीवर टीका करायची आणि मग त्यांना राग आला की, त्याच्या तोंडून चुकीचं वाक्य निघालं की मग त्याचं भांडवल करायचं ही विरोधकांची रणनीती असल्याचंही ते म्हणाले. 


नारायण राणेंना केंद्रात मानाचं स्थान


कोकणात ज्या ज्या नेत्यांची सत्ता येते, त्या त्या नेत्यांना मंत्रिपदं मिळतात. नारायण राणे यांना कोकणातील प्रतिनिधी म्हणून मानाचे स्थान दिल्लीमध्ये मिळालं. मात्र सध्याच्या खासदारांना कोणी ओळखत नाही, ते प्रतीमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात वावरत होते अशी घणाघाती टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली आहे. 


कोकणातील जो जो खासदार होतो तो केंद्रात मंत्री होतो, नारायण राणे निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री होतील असं दीपक केसरकर म्हणाले. राणेंना कोकणचा वाघ म्हणून ओळखलं जातं, नारायण राणे यांची कोकणचा नेता म्हणून प्रतीमा आहे अशी स्तुतीसुमनंही त्यांनी उधळली.  


शिवसेना सोडून गेले आणि निवडून आले


महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेला नेता पुन्हा आमदार झाला नाही. मात्र नारायण राणे यांनी स्वतः सह 11 आमदारांचे राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवले. यातून राणेंनी कोकणावर आणि महाराष्ट्रावर किती पकड आहे हे दाखवून दिलं असं दीपक केसरकर म्हणाले.


पवारांनी शिवसेनेची ताकद संपवली


सन 2014 ला मागितला नसताना देखील शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि शिवसेनेची ताकद संपवली. 2017 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची बोलणी केली, यावेळी मोदींनी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली तरी चालेल, मात्र शिवसेना आमच्या सोबत सरकार मध्ये राहील असं सांगितलं. मात्र शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही असं शरद पवार म्हणाले. एवढा द्वेष ते शिवसेनेचा करत होते. त्यामुळे शिवसेना फुटली.


उद्धव ठाकरे लाचारी करतात


दीपक केसरकर म्हणाले की, सन 2019 ला काठावर बहुमत घेऊन सरकार आलं तेव्हा राज्यात राष्टपती राजवट आणण्यात शरद पवारांचा हात होता असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. तर एक प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय दुसरा प्रादेशिक पक्ष वाढत नाही हे समीकरण शरद पवारांनी महाराष्ट्रात राबवलं. मात्र उद्धव ठाकरे त्यांची लाचारी करतात हे योग्य नाही. 


'जय भवानी' हा शब्द मशालगीत मधून वगळण्याची निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली तरी चालले परंतु तो शब्द वगळणार नाही अशी भूमिका घेतली. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "हिंदुत्त्वाच्या गप्पा मारायला उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहीलं आहे? आमची हिंदूंची व्याख्या धर्मावर आधारित नाही. देशात विकासाची लाट असताना राज्यात केवळ भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे."


ही बातमी वाचा: