ठाणे: शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. हा वाद शुक्रवारी रात्री शिगेला पोहोचला आहे. कारण, कल्याणमधील स्थानिक भाजप (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. कल्याण लोकसभेची (Kalyan Loksabha) जागा ही भाजपलाच मिळायला हवी. ही जागा श्रीकांत शिंदे यांना सोडल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्या मदतीसाठी प्रचारात उतरणार नाही, असा ठराव स्थानिक भाजपकडून मंजूर करण्यात आला आहे. 


या घटनेमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक स्तरावर तणाव निर्माण झाला आहे. अगोदरच यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि हिंगोली मतदारसंघात भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना आपल्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देता आली नव्हती. अशातच आता श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी असहकार्याची भूमिका घेतली आहे. 


नेमकं काय घडलं?


कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा, अशी ठाम भूमिका घेतली. कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाहीत, असा ठराव गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात मंजूर करण्यात आल्याचे समजते. आता भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते वरिष्ठांकडे तशी मागणी करणार आहेत. कल्याण लोकसभा भाजपला मिळाली नाही तर भाजप कार्यकर्ता काम करणार नाही, असा ठराव करुन सह्यांचे निवेदन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात येणार आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता ठाणे आणि कल्याणमधील शिवसेनेचे कार्यकर्तेही आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


पक्षाला गरज होती म्हणून मी 2014 मध्ये उमेदवार झालो, शिंदे साहेबांनी दिवस रात्र काम केलं : श्रीकांत शिंदे