इंदापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातील अजित पवार यांच्याविरोधात नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. इंदापूरमध्ये महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश या मेळाव्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होता. मात्र, या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांच्या भाषणांचा एकूण सूर पाहता अजित पवार यांच्याविषयीच्या त्यांच्या मनात अद्याप साशंकता असल्याचेच दिसून आले. त्यामुळेच अंकित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना अजितदादा गटाचा पाठिंबा मिळेल, याचे आश्वासन मिळावे, अशी मागणी जाहीरपणे बोलून दाखवली. तर हर्षवर्धन पाटील यांनीही अनेक तक्रारींचा पाढा वाचत स्थानिक पातळीवर अजितदादा गटाकडून होणाऱ्या दबावाच्या राजकारणाविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.


या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या मनातील सर्व शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमध्ये झालेल्या पराभवाचे शल्य आमच्या मनातही असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, 2019 साली राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. पण इंदापूर तालुक्यात अपघात झाला. आमचे 25 वर्षांपासूनचे स्नेही हर्षवर्धन पाटील यांनी आमच्या आग्रहाखातर कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पण त्यावेळी वेळ कमी पडला आणि मतदारसंघात वेगळ्याच प्रकारचे राजकारण झाले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना 2000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा हा पराभव आमच्याही मनाला बोचणारा होता. आम्हाला हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाची खात्री होती. पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांनी भरलेले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


वर्षानुवर्षे ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्याशी जुळवून घेणं कठीण, पण आपल्याला मोदींना पंतप्रधान कराचयंय: देवेंद्र फडणवीस


एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपलं सरकार धडाडीने काम करत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद असल्याने अजित पवार आपल्यासोबत आले. आता कोणी आपल्यासोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही? आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही? आपल्याला संघटित पद्धतीने मोदींची ताकद वाढवण्याची गरज होती. त्यामुळे आपण अजित पवार यांना सोबत घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत आल्याने आपली ताकद वाढली. पण आजपर्यंत बहुतांश ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष होता, याची मला कल्पना आहे. तुम्ही सगळे इतकी वर्षे इंदापूरमध्ये राष्ट्रवादीशी संघर्ष करत होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात भावना तयार होणं,साहजिक आहे. आता त्यांच्यासोबत काम कसं करायचं, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. 


या सगळ्याची कल्पना असल्यामुळे मी अजित पवार यांना सोबत घेण्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना या सगळ्याविषयी सांगितले होते. तुम्हाला मतदारसंघात विरोधाला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागेल, याची कल्पना त्यांना दिली होती. पण आपल्या पंतप्रधान मोदींसाठी हा निर्णय करायचा आहे, हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यावर हर्षवर्धन पाटील मला म्हणाले की, मला त्रास होईल. ते एकच वाक्य बोलले, नेत्यांना युती करणं सोपं असतं, पण कार्यकर्त्यांना युती करणं कठीण असतं. कारण ते जमिनीवर एकमेकांशी लढतात. तरीही मी प्रत्येक कार्यकर्त्याला समजावेन, असे हर्षवर्धन पाटलांनी म्हटल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.


आणखी वाचा


पोलिसांना वरुन कोणाचा तरी फोन येतो, तेवढा फोन बंद करा; फक्त तुमच्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतोय : हर्षवर्धन पाटील