मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना अखेर मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. मालेगावातील रेणूका देवी सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक झाली होती. 


नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी मालेगावातील रमजानपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी
पोलिसांनी अद्वय हिरे यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर 23 नोव्हेंबर 2023 पासून हिरे न्यायालयीन कोठडीत होते. 


शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांना शह देण्यासाठी अद्वय हिरे यांना उपनेतेपदी संधी दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये नाशिक पोलिसांनी अटक केली होती.


नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हिरे यांच्या कुटुंबाचा दबदबा कायम राहिलेला आहे. अद्वय हिरे यांनी 27 जानेवारी 2023 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंकडून अद्वय हिरे यांना बळ दिलं जाण्याची शक्यता आहे.


अद्वय हिरे यांना सूतगिरणी कर्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता अद्वय हिरे यांना जामीन मिळाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होऊ शकते. अद्वय हिरे यांना जामीन मिळाल्यानं मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील रंगत वाढणार आहे.


अद्वय हिरे-दादा भुसे आमने सामने येणार?


अद्वय हिरे यांना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केल्यानं ठाकरे गटाला दिलासा मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्वय हिरे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, अद्वय हिरे यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद देण्यात आलं होतं. गेल्या नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अद्वय हिरे तुरुंगात होते. 


संबंधित बातम्या :


दादा भुसेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाची नवी खेळी, अद्वय हिरे यांची उपनेतेपदी वर्णी


Apoorva Hiray : नाशिकच्या अद्वय हिरेंच्या नंतर आता मोठे बंधू अपूर्व हिंरेंवर गुन्हा दाखल, 10 लाखांची फसवणूक केल्याबद्दल होणार कारवाई