Nashik News Update : शिवसेनेत बंडोखोरी करून शिंदे गटात गेलेल्या आमदार दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने नवी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाच्या उपनेतेपदी मालेगावच्या अद्वय हिरे  (Advay Hiray)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  उपनेते पद मिळाल्यानंतर मालेगात हिरे यांची मिरवणूक काढून जल्लोष करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी ' उद्धव ठाकरे गटाने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. शिवाय उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावात हालचाली गतिमान झाल्या आहेत.  


राज्याच्या राजकारणात उध्दव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट यांनी एकमेकांसमोर दंड थोपटलेले असतांना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी मालेगावच्या अद्वय हिरे यांची वर्णी लावण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना मालेगावात आव्हान उभे करून एकप्रकारे शह देण्यात आल्याचे बोलले जात आहे. उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आज अद्वय हिरे यांचे मालेगावात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात हिरे यांची मालेगावात मिरवणूकही काढण्यात आली. येत्या 26 मार्चला मालेगाव येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्याने मालेगावच्या राजकारणात पुन्हा एकदा रंग भरू लागले आहेत. 


कोण आहेत अद्वय हिरे? 


नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्राला हिरे कुटूंबीय नवीन नाही. भाऊसाहेब हिरे यांच्यापासून प्रशांत दादा हिरे अशा सर्वांचीच राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकरणात आपला दबदबा कायम राखला. आता हिरे कुटूंबातील पुढची पिढी भाजपमध्ये असलेल्या अद्वय हिरे यांनी 27 जानेवारी 2023 रोजी शिवबंधन हाती बांधून मालेगावच्या मैदानात नव्या इनिंगला सुरवात केली आहे.  


2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या प्रशांत हिरे यांचा दादा भुसे (Dada Bhuse) या नवख्या उमेदवाराने पराभव करून हिरेंच्या साम्राज्यला सुरुंग लावला होता. पुन्हा 2009 मध्येही आधीचा दाभाडी आणि आताच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसेंनी विजय संपादित करून आजपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. दरम्यानच्या काळात जनराज्य आघाडी नावाचा पक्ष अपूर्व हिरे यांनी सुरु करून महापालिका निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर नाशिक शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर आमदार झाले. मात्र 2014 नंतर अचानक हिरे कुटुंबियांना भाजप मुख्यत्वे मोदी करिष्म्याचा साक्षात्कार झाला. अपूर्व आणि अद्वय या दोन्ही बंधूनी कमळ हाती घेऊन आपली कारकीर्द सुरु केली होती. 


2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढली. मात्र भाजपच्या सीमा हिरेंनी त्यांचा पराभव केला. तेव्हाही अद्वय हिरे भाजपमध्येच राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अद्वय यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. मात्र शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यानं दादा भुसे यांच्याशी जमवून काम कसं करणार? दादा भुसे आमदार असताना आपल्याला पुन्हा मालेगाव बाह्य मधून निवडणूक लढण्याची संधी मिळणार का असे प्रश्न निर्माण झाल्यानं राजकीय अवकाश शोधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले. मध्यंतरीच्या काळात भाजपमध्ये असूनही त्यांनी दादा भुसे यांच्या विरोधात आंदोलन करत भविष्यात काय घडणार याची चुणूक दाखवून दिली होती.