अहमदनगर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना तुम्ही 88 उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि 8 जागा निवडून आणून दाखवा, असे आव्हानच दिले आहे. आता यावरून मनोज जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळांचा थेट पागल म्हणून उल्लेख केलाय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे त्यांनी म्हटले आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. 


मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) सध्या चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे. ही रॅली आज अहमदनगरमध्ये येऊन धडकली. यावेळी एबीपी माझाशी संवाद साधताना मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर निशाणा साधला. 


छगन भुजबळ पागल झालेत


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर आम्ही 288 उमेदवार उभे करणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणतात. तुम्ही आधी 88 उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त 8 उमेदवारच निवडून आणून दाखवा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझे तुम्हाला आव्हान आहे की, तुम्ही विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभेच करुन दाखवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ पागल झाले आहेत. मराठा काय करू शकतो हे त्यांना माहिती आहे, असे प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना दिले आहे. 


शरद पवारांच्या भूमिकेबाबत काय म्हणाले मनोज जरांगे? 


शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय पक्षांची बैठक बोलवण्यासाठी प्रयत्न करेल, असे म्हटले. यावर बोलताना आता त्यांचे हे नाटक कुठंवर चालणार कुणाचं ठाऊक? असं जरांगे म्हणाले. हे नाटक केवळ मराठ्यांसाठीच सुरू आहे. या लोकांचे आता हे किती दिवस चालणार? एक म्हणतो विरोधी पक्ष येत नाही, एक म्हणतो सत्ताधारी पक्ष येत नाही, याचं कुठंवर चालणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अहमदनगरमध्ये सर्व रस्ते मराठा बांधवांनी फुलून गेले आहेत. यावरून उशिरा का होईना मराठा एकत्र आल्याचा आनंद वाटत असल्याचे देखील मनोज जरांगे यांनी सांगितले. 


आणखी वाचा 


Sharad Pawar: मराठा-ओबीसी आरक्षण सोडवण्यासाठी शरद पवार अखेर मैदानात उतरले, मनोज जरांगेंना सर्वपक्षीय बैठकीला बोलावण्याचा सल्ला