Shivsena Dispute: शिवसेना चिन्ह गोठवले जाण्याचीही शक्यता; सुनावणी पुढे ढकलताच, असीम सरोदेंचं धक्कादायक भाकीत
Shivsena Dispute: आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र या प्रकरणाला तब्बल साडेतीन वर्षे उलटून गेली असतानाही अजूनही केवळ तारीखच दिली जात आहे.

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाणावर अंतिम सुनावणी पार पडणार होती. मात्र आज सुनावणी आधीच कोर्टाने या प्रकरणाती सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (२३ जानेवारीला) होणार आहे. राज्यात महापालिका (Shivsena Dispute) निवडणुकीच्या निकालानंतर आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या निकालाचे परिणाम महापालिकेतील सत्ता समीकरणावरही होणार होती. परंतु ही अंतिम सुनावणी पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे.(Shivsena Dispute)
त्यानंतर आता वकिल असीम सरोदे यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना सरोदे म्हणाले की, आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र या प्रकरणाला तब्बल साडेतीन वर्षे उलटून गेली असतानाही अजूनही केवळ तारीखच दिली जात आहे. पुढील सुनावणीसाठी 23 तारीख देण्यात आली असून त्या दिवशी निकाल येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे पक्ष फोडण्याची प्रक्रिया भविष्यात भाजपसाठीही धोकादायक ठरू शकते, कारण पुढे काहीही घडू शकते. त्यामुळे या प्रकरणावर स्पष्टता येणे अत्यंत गरजेचे असून हा निकाल खूपच महत्त्वाचा आहे.(Shivsena Dispute)
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिले जाऊ शकते किंवा ते गोठवले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच, आतापर्यंत या चिन्हावर निवडून आलेले खासदार, आमदार किंवा नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांतील नगरसेवकांवर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता
शिवसेना नाव व निवडणूक चिन्हाबाबतची महत्त्वाची सुनावणी आज होणार होती. मागील सुनावणीत न्यायालयाने 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंतिम सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले होते. या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना सुमारे पाच तासांचा वेळ देण्यात येणार असून, त्यानंतर आज किंवा उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली. सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयात इतर एका प्रकरणात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने, दोन्ही पक्षकारांची मते विचारात घेऊन न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेना नाव व चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.
तर आज सकाळीच वकिल असीम सरोदे यांनी सुनावणी आज होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली होती. दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजल्यापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगाबाबतच्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.























