Raj Thackeray: ...मग राज ठाकरेही षंढ आहेत का? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याचा प्रतिसवाल
Maharashtra Politics: राज ठाकरे सुद्धा षंढ आहेत का???विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीनं देशपांडेंवर हक्कभंगाची कारवाई करू, असे शिंदे गटाचे नेते नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी चांगले संबंध आहेत. एकदा नाही तर, अनेकदा आम्ही त्यांना या नेत्यांकडं बसलेलं बघितले आहे. इतके चांगले संबंध असतानाही अशा शब्दांचा प्रयोग करीत असतील तर ते इनडायरेक्टली आपल्या नेत्याला पण असेचं (षंढ) बोलत आहेत का? असा प्रश्न हक्कभंग समितीचे प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित केला. त्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप देशपांडेंना (Sandeep Deshpande) खडे बोल सुनावले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची उंची किती? महाराष्ट्र सरकारचे दिग्गज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रथम सन्मान असायलाचं पाहिजे. संदीप देशपांडे यांच्या या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. मात्र, सरकारच्या विरोधात ते बोलत असल्यानं सरकार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदारांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीनं नक्कीचं देशपांडे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करू, असा इशारा भोंडेकर यांनी दिला आहे.
Sandeep Deshpande News: संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले होते?
पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला षंढ म्हटले होते. संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विधानभवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात व्यासपीठावर हिंदी आणि इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आला होता. त्यावरुन संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी म्हटले होते की, 'हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विधानभवनात सगळे षंढ बसले आहेत. हे पाहून मराठी माणसाने काय करायचं', असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात गदारोळ उडाला होता. मात्र, संदीप देशपांडे यांनी मी माझ्या विधानावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले होते. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. कारण मी त्यावेळी कोणत्याही व्यक्तीला उद्देशून बोललो नाही तर वृत्तीला उद्देशून बोललो. माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तर मी कारवाईसाठी तयार आहे. तसेच माझा शब्द कोणाला झोंबला असेल तर त्यांनी विचार करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा






















