नवी दिल्ली: खरा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे, असे वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे. जर त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. रामदास आठवले यांचाही पक्ष आहे. काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात, अशी टिप्पणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आज दिल्लीत दाखल होती. पुढील दोन दिवसांत ते काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतील.
आज काँग्रेसचे काही प्रमुख नेते त्यांना भेटायला येणार आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीतील मराठी पत्रकारांशी संवाद साधतील. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचीदेखील ते भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय खासदारांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ८ तारखेला उपराष्ट्रपती यांनी त्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं आहे, ते तिकडे जातील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधान संसदेत यायला तयार नाहीत: संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत यायला तयार नाहीत. बांगलादेश पेटला आहे, याकडे मोदींनी लक्ष द्यायला हवे. बांगलादेशप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. लोकशाहीचा मुखवटा लावून देशात जी हुकुमशाही केली जाते तिथे जनता त्यांना माफ करत नाही, एवढंच हसीना यांच्याबाबत बोलता येईल. त्यांनी विरोधकांना जेलमध्ये टाकलं, त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देश चालवला ,त्याचा अंत अशा पद्धतीने झाला, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा जागावाटपाबाबत संजय राऊतांचं भाष्य
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा होईल. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये मतभेद नसावा यासाठी दिल्लीतील महाविकास आघाडीच्या हायकमांडसोबत चर्चा होईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
"शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो," मतांचं गणित मांडत प्रकाश आंबेडकर यांचं मोठे विधान!