Bangladesh Violence: नवी दिल्ली : बांगलादेशातील (Bangladesh) हिंसक निदर्शनं आणि आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला. सध्या बांगलादेशातील वातावरण प्रचंड अस्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, देश सोडला. तेव्हापासूनच बांगलादेशात अंतरिम सरकार (Interim Government) स्थापन करण्याच्या हालचालींनी वेग धरला आहे. येत्या 48 तासांत काळजीवाहू सरकार स्थापन करू, असं आवाहन बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी जनतेला केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. अशातच मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशातील हिंसक निदर्शनं आणि आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतल्यानंतर अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानपदी असलेल्या शेख हसीना यांना तात्काळ राजीनामा देऊन देश सोडावा लागला. त्या सोमवारी संध्याकाळी भारतात पोहोचल्या आणि सध्या त्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसच्या सेफ हाऊसमध्ये आहेत, अशी माहिती मिळत आहे. दुसरीकडे, या मुद्द्यावरून भारतातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्र्यांशी साधला संवाद
पंतप्रधानांच्या निवासस्थानी CCS ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली. दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनीही यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारल्याचं समोर आलं आहे. एस. जयशंकर म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, काही कळताच, त्यासंदर्भात माहिती कळवेन.
राहुल गांधींनी एस. जयशंकर यांना विचारला प्रश्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं समोर आलं आहे की, सोमवारी लोकसभेचं कामकाज दुसऱ्या दिवशी तहकूब करण्यात आलं, तेव्हा राहुल गांधी आपल्या जागेवरून उठले आणि सभागृहात एस. जयशंकर यांच्याकडे गेले. त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना विचारलं की, बांगलादेशात काय चाललं आहे? सरकारची भूमिका काय? शेख हसीना भारतात आल्या आहेत का? याशिवाय आणखी काही असे प्रश्नही त्यांनी विचारले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे प्रश्न ऐकून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जशी काही माहिती मिळेल, मी तुम्हाला नक्की सांगेन.
बांगलादेशातील पीएम हाऊसमध्ये आंदोलक घुसले
बांगलादेशातील हजारो आंदोलकांनी सोमवारी राजधानी ढाका येथील शेख हसीना यांच्या सरकारी निवासस्थानात घुसून तोडफोड केली. आंदोलकांनी त्यांचे वडील मुजीबुर रहमान यांचा पुतळा हातोड्यानं फोडला आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यालयांना आग लावली. 76 वर्षीय हसीना यांनी त्यांच्या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाल्यामुळे राजीनामा दिला आहे.
बांगलादेशातील हिंसाचाराचं नेमकं कारण काय?
1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मागणीसह गेल्या महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनाचे नंतर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये रूपांतर झाले. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातील उत्साही जनसमुदाय त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला.
शेख मुजीब यांच्या पुतळ्यावर आंदोलकांकडून हातोडा
शेख हसीना यांच्या राजीनाम्यामुळे त्यांची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. हजारो आंदोलकांनी लष्करी कर्फ्यूचे उल्लंघन करून त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर धडक दिली. सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये, आंदोलक ढाका येथील 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धातील नायक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढले आणि हातोड्यानं पुतळा तोडला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :