Who Is Nahid Islam? नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशाच्या नजरा बांगलादेशकडे (Bangladesh Violence) लागल्या आहेत. सध्या बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. अशातच शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, देश सोडला. बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी जी व्यक्ती प्रयत्नशील आहे, ती व्यक्ती म्हणजे, विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम (Nahid Islam). विद्यार्थी नेता नाहिद इस्लाममुळेच हसीना शेख यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि देशातून पळून जावं लागलं. 'स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन' या विद्यार्थी संघटनेचा तो समन्वयक आहेत. त्यांनी येत्या 24 तासांत अंतरिम सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. 


नाहिद इस्लाम ही ढाका विद्यापीठाची विद्यार्थी आहे. नाहिद हा त्या चळवळीचा चेहरा आहे, ज्यामुळे शेख हसीना यांना घाईघाईनं आपला देश सोडावा लागला. 20 जुलै रोजी सकाळी पोलिसांनी नाहिदला अटक केल्याचा आरोप केला जात होता. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला. 


पोलिसांनी उचललं, मारहाण केली


दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ज्या व्हिडीओमध्ये नाहिद इस्लामला पोलीस त्यांच्या गाडीत बसवून नेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. बेपत्ता झाल्याच्या 24 तासांनंतर नाहिद इस्लाम पुलाखाली बेशुद्धावस्थेत सापडला होता. तो बेशुद्ध होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा त्यानं केला होता.


यापूर्वी नाहिद इस्लामचे मित्र आसिफ महमूद आणि अबू बकर यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. सहा दिवसांनंतर, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आणि एका निर्जनस्थळी, दुर्गम भागात त्याला सोडण्यात आलं. तेव्हापासून या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी 26 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातूनच पुन्हा ताब्यात घेण्यात आलं.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, यादरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून आंदोलन संपवण्याचं आवाहन करणारे व्हिडीओ तयार करुन घेतले. त्यानंतर नाहिद इस्लाम जेव्हा पोलीस कोठडीतून बाहेर आले, त्यानंतर त्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि तशी पावलंही उचलली. परिस्थिती अशी होती की, शेख हसीना यांना आपलं पद सोडावं लागलं आणि देशही सोडावा लागला.


24 तासांत अंतरिम सरकार स्थापन होणार


पत्रकार परिषदेत नाहिद इस्लाम यांनी येत्या 24 तासांत अंतरिम सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी विद्यार्थी संघटना आपला प्रस्तावही मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, "आम्ही सर्व समन्वय समिती, नागरी समाज आणि राजकीय आणि राज्य संबंधितांशी चर्चा करू. अंतरिम सरकारची रूपरेषा 24 तासांत मांडली जाईल. जर लष्कर घुसलं तर देशात आणीबाणी लादली जाते आणि सरकार स्थापन झालं तर ते स्वीकारले जाणार नाही, असं नाहिद इस्लाम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. 


बांगलादेशातील हिंसाचाराचं नेमकं कारण काय?


1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मागणीसह गेल्या महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनाचे नंतर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये रूपांतर झाले. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातील उत्साही जनसमुदाय त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bangladesh Violence: शेख हसीनांचा राजीनामा म्हणजे, राजकीय निवृत्ती? मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी सांगितलं, "माझी आई आता..."