दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दिशा सालियन (Disha saliyan) मृत्यूप्रकरणही समोर आलं होतं. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेत व मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने आवाज उठवत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे दिशाच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत यात आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) कुठलाही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहेत. मात्र, आता याप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देत म्हणणे सादर करण्याचे सूचवले आहे. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज का? हे पटवून द्या, असा सवाल उच्च मुंबई न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे. याप्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाकडून (High court) याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल आहे. आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, असा अर्ज ठाकरेंच्यावतीने देण्यात आला आहे.
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. 8 जून 2020 रोजीचं दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटिव्ही फुटेज तपासलं जावं, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे अन् रिया चक्रवर्तीमध्ये फोनकॉल
सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं?, याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचीही सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या सुनावणीत आपलीही बाजू ऐकून घ्यावी यासाठी आदित्य ठाकरेंनीही स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी न्यायायलयात सुनावणी झाला असता उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यात आदित्य ठाकरेंच्या चौकशीबाबत पटवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.























