Archana Patil Chakurkar : राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या मध्यस्थीमुळे आणखी एक काँग्रेस नेत्या भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (Shivraj Patil) चाकूरकर सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar) या देखील भाजपामध्ये डेरेदाखल दाखल होणार आहेत. यामुळे मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


मराठवाड्यात काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर येत्या काही दिवसात भाजपात प्रवेश करतील असं खात्रीलायक वृत्त आहे. मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यानंतर काही दिवसांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनीही भाजपात प्रवेश केला. काँग्रेसमधले अनेक गटातटाच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा गट कायमच चाकूरकर गटाशी संलग्न होता. येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. या सर्व बाबींच विचार करता अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपची वाट धरल्याचे बोलल जात आहे.


शिवराज पाटील चाकूरकरांनी प्रतिक्रिया देणे टाळले 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरूमकर हे भाजपात गेल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चाकूरकरांची सून अर्चना पाटील याही भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा जोर धरत आहे. या बाबतही चाकूरकर गटातून कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही. या सर्व कारणामुळे लातूर लोकसभेचा उमेदवार निवडताना आमदार अमित देशमुख यांनी जातीय समीकरणाकडे लक्ष दिलं. 


लोकसभेसाठी काँग्रेसकडून लिंगायत उमेदवार 


लिंगायत समाजातील उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात त्यांना यश आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचारापूर्वी भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांची संवाद साधण्याची प्रक्रिया त्यांनी काही दिवसापूर्वीच सुरुवात केली आहे. यातून जिल्ह्याचं बदलतं राजकारणच दिसून येत आहे. मागील वीस वर्षापासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्या निवडणूक लढवणार अशी चर्चा होतच असते. आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच त्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील, अशीही माहिती समोर येते आहे.


इतर महत्वाची बातमी 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, लोकसभा निवडणुकीत 'या' ठिकाणी घड्याळ चिन्ह मिळणार नाही