मुंबई: महायुतीच्या जागा वाटपावर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच आता शिवसेनेचे (Shiv Sena Eknath Shinde) अनेक आमदार, कार्यकर्ते आणि नेते नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे शिवसेनेच्या काही जगावर भाजपने (BJP) केलेला दावा. ठाकरेंना सोडून विश्वासाने शिंदेंसोबत आलो, पण विद्यमान खासदारांनाही तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागतेय, मग विधानसभेच्या वेळी आमदारांचं काय असा प्रश्न आता अनेकांना पडल्याचं दिसतंय. 


निगेटिव्ह सर्वेच्या नावावर भाजपचा दावा


'अबकी बार 400 पार' भाजपचे या लोकसभा निवडणुकीचे घोषवाक्य, आणि हेच 400 पार करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलंय. राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर देखील कसलीय. मात्र हे करत असतानाच भाजप सोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार मात्र सध्या नाराज दिसतायेत. 


निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली भाजपने शिंदे गटाच्या जागा बळकावण्याचं सत्र सुरू केल्याची भावना सध्या शिवसेना शिंदे गटाची आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी तर आमच्या जागेवरच का हट्ट? तुमच्या जागा आम्ही मागितल्या का? माझ्या मते एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत असा इशाराच थेट भाजपला दिलाय.


ज्या जागावरून शिंदेचे आमदार आणि नेते नाराज आहेत त्या जागा तरी नेमक्या कोणत्या ते पाहूयात,


अमरावती - या जागेवर भाजपने नवनीत राणा उमेदवारी दिली असून, शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांनी दावा केलाय. तर बच्चू कडू यांनी देखील या उमेदवारीवर आक्षेप घेतलाय. 


रत्नागिरी सिंधुदुर्ग - या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नारायण राणे यांचे नाव निश्चित झाले असून, शिवसेनेचे किरण सामंत देखील इच्छुक आहेत. 


ठाणे - ठाण्याच्या जागेवर शिवसेनेने दावा केलेला असताना भाजपचा देखील या लोकसभा मतदार संघावर डोळा आहे.


धाराशिव - शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या धाराशिव लोकसभेत भाजपने फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून राणा जगजीत पाटील यांच्यासह शिवसेनेकडून मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.


छत्रपती संभाजी नगर - मराठवाड्यात शिवसेना वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधून मोदींसाठी एक कमळ निवडून पाठवा असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे तर सेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.


हिंगोली - शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार असावा ही मागणी घेऊन भाजपच्या आमदारांसह लोकप्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे इथंही भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.


परभणी - बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेऊन भगवा फडकवण्याचे काम केलेल्या परभणी मतदारसंघावरही भाजपची नजर आहे. भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर, राहुल लोणीकर यांच्यासह इच्छुकांची मोठी फौज आहे. त्यामुळे शिवसेनेची जागा धोक्यात येण्याची चिन्ह आहेत.


नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचं जाहीर केलं. तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या जागेवर दावा सांगितला जात आहे. 


मुंबई उत्तर पश्चिम - खासदर गजानन कीर्तिकर यांच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी भाजपने दावा केला आहे. तर शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे.


कार्यकर्ते नाराज, मात्र नेत्यांचं मत वेगळंच


दरम्यान, एकीकडे शिंदेचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत असताना भाजप नेते मात्र अशी कोणतीच नाराजी नसल्याचे सांगत आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी तर तिन्ही नेते एकत्र बसून राज्यात 45 जागा कशा निवडून येतील यासाठी काम करत असल्याचे सांगितलंय.


उद्धव ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला त्रासून भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांच्या मनात आजही धाकधूक कायम आहे. हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागत असल्याने शिंदेंच्या आमदार, खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. 


भाजप स्वतःची संघटना आणि शक्ती वाढवत आहे तर अजितदादा पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोजक्या पण निवडून येणाऱ्या जागा पदरात पाडून घेत असताना आपल्या हाती काय आलं असा सवाल आता शिंदे सेनेतील नेते विचारू लागले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार का? आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरब्बी नेत्यांसमोर शिवसेनेचा टिकाव लागणार का हा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.


ही बातमी वाचा: