मुंबई : महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज मुंबईत मातोश्री निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी पत्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याबाबत जबाबदारी झटकली जात आहे का असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना त्यांनी एक नियम सांगितला.  यानंतर शरद पवार यांनी विरोधक राजकारण करत आहेत या आरोपावर देखील उत्तर दिलं. कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य  सुद्धा या सरकारमध्ये नाही , अशा शब्दात शरद पवार यांनी आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं. 


शरद पवार यांनी नियम सांगितला


शरद पवार यांना राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात ब्लेम गेम सुरु आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की पुतळ्याची जवाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे. ते नाकारू शकतं नाही. राज्यात कुठंही आणि कुणाचाही पुतळा उभारायचा असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. इथं पुतळ्याच्या उद्घाटनासाठी प्रामुख्यानं राज्य सरकारचे प्रतिनिधी तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करण्यासाठी आले होते, त्यामुळें जवाबदारी राज्य सरकारची आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. 


विरोधक राजकारण करत आहेत, सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर शरद पवार काय म्हणाले?


सरळ गोष्ट आहे, यात राजकारण काय आहे. शिवाजी महाराजांच्या काळामधील एक गोष्ट लोकांना भावली. त्यांच्या कार्यक्षेत्रात रांझ्याच्या पाटलानं एका भगिनीवर अत्याचार केले. ही तक्रार शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर त्यांनी त्याचे दोन हात कलम केले होते, असं शरद पवार म्हणाले.  या प्रकरणांमध्ये महाराजांची नीती काय हे त्यांनी समोर ठेवलं. एका भगिनीला त्रास दिल्यावर सक्त निर्णय त्यांनी घेतला. आज तसा निर्णय घेणाऱ्या राजाची प्रतिकृती समुद्रावर ज्यावेळी तयार करुन आणली गेली. ती तयार करताना जो भ्रष्टाचार केला गेला त्यामुळं आज ती मूर्ती उध्वस्त झाल्यासारखी दिसते, असं शरद पवार म्हणाले. कुणी सांगतं वारं होतं, कुणी काय कारण  सांगतं, जिथं प्रधानमंत्री जाऊन आले, त्यांच्या हस्ते अनावरण झालं. आज या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही. त्यामुळं शेवटी लोकांच्यामध्ये तीव्र भावना आहे. ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभी करावी यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असं शरद पवार म्हणाले. 


इतर बातम्या :



सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? राणे -ठाकरेंच्या राड्याची A टू Z कहाणी!