मुंबई:  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उत्साह  वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठी (Vidhan Sabha Election 2024) एक सर्वेक्षण करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून करण्यात आलेला हा अंतर्गत सर्व्हे आहे. या सर्व्हेमध्ये महाविकासआघाडीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला  आहे.  तसेच  महाविकासआघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. तर महायुतीसाठी विधानसभा निवडणूक अवघड असल्याचे देखील या सर्व्हेतून समोर आा आहे. ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल पाहता महाविकास आघाडीचे  आशादायक चित्र असल्याची चिन्हं दिसत आहेत. 


लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसनं राज्यात 13 जागा निवडून आणल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे तीन तेरा वाजवले. विदर्भ, मराठवाड्यात दमदार कामगिरी करुन काँग्रेसनं राज्यात जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर आता पक्षानं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमुळे पक्षात उत्साह संचारला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेसने अंतर्गत सर्व्हे केला आहे. काँग्रेसच्या या प्राथमिक सर्व्हेमध्ये महाविकासआघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्व्हेनुसार सर्वाधिक म्हणजे 80-85 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर सर्वात कमी म्हणजे 30-35 जागा ठाकरे गटाला मिळण्याचा अंदाज आहे. 


सर्वात कमी जागा ठाकरे गटाला


सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येण्याची शक्यता आहे. जवळपास 80-85 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 55-60 जागा तर सर्वात कमी म्हणजे 30 ते 35 जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. हा अंतर्गत काँग्रेस पक्षाचा सर्व्हे आहे.


160-170 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता


दुसरीकडे महायुतीचा पक्षांचे बलाबल काँग्रेसने या सर्व्हेतून हाती घेतले आहे. 60-62 जागा भाजपला, शिंदे गटाला 30-32 तर अजित पवार गटाला 8-9 जागा मिळण्याची शक्यता आहे.  या सर्व्हेतून किमान 160-170 जागा महाविकास आघाडीला मिळतील. महाविकास आघाडीचे सरकार येईल असा सर्व्हेतून अंदाज वर्तवण्यात आला आहे . 


मविआ मुंबईतील तिढा कसा सोडवणार?


 मुंबईतील जागावाटपाचं महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं कायम आहे. 2019 ला जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर अजूनही चर्चा सुरूच आहे. काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्षांचा दावा कायम आहे. त्यामुळे मविआच्या पुढील बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होत राहणार आहे शिवसेना ठाकरे गट अजूनही 20  ते 22 जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेसही आग्रही आहे. राष्ट्रवादीने मुंबईतल्या 5 ते 7 जागांवर आपला दावा सांगितलाय.