Nagpur News नागपूर : नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे जाती-धर्माच्या वर उठून राजकारण करतात. त्यामुळे ते प्रत्येक जातीधर्मातील लोकांना हवेहवेसे वाटतात. ते फक्त विकासाची गोष्ट करतात, त्यामुळे त्यांची स्वीकार्यता इतरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घातलेच पाहिजे, असे मत नागपुरातील (Nagpur News) सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे. तर पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शहा (Amit Shah) एवढेच वरिष्ठ आणि अनुभवी नितीन गडकरी आहेत. मात्र मोदी आणि शहांमुळे त्यांना मिळावे तेवढं महत्त्व मिळत नाही, आता महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींच्या सक्रियतेतून त्यांना ही तितके महत्त्व मिळावे, अशी अपेक्षा नागपुरातील सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केली आहे. 


मोदी- शहांमुळे नितीन गडकारींचे महत्त्व कमी


गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. तर राज्यासह विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर (Nagpur) लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतीत गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे.


असे असताना नितीन गडकारींनी आजवर  विकासाचे राजकारण केलंय. त्यांनी कधीही जाती-पातीला आणि पक्षाला विकासाच्या आड येऊ दिले नाही. मात्र देशभर आपल्या विकासाचे जाळं विणणाऱ्या गडकारींना त्यांच्याच पक्षात हवं तितके महत्व मिळत नसल्याची खंत नागपूरकरांनी बोलून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळावी, अशी इच्छाही काही नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.


गडकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि प्रचारात जास्त भूमिका बजवावी- आरएसएस 


दुसरीकडे, महाराष्ट्राची विद्यमान राजकीय परिस्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेले राजकीय आव्हान पाहता, राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि प्रचारात यंदा काही अंशी जास्त भूमिका बजवावी, असा आग्रह केल्याची माहिती पुढे आली आहे. गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेने मवाळ चेहरा तसेच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्रातील जनतेचे मनात असलेली त्यांची प्रतिमा पहाता, संघाला वाटतंय की विद्यमान परिस्थितीत नितीन गडकरी हे महाराष्ट्र भाजपसाठी मदतीचे ठरू शकतात. 


त्याच अनुषंगाने त्यांना यंदा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तसेच निवडणुकीच्या नियोजनामध्ये तुलनेने जास्त सक्रिय राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती संदर्भात संघाचे असे आकलन असले तरी भाजपकडून या संदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप श्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेतात आणि गडकरी खरंच विधानसभा निवडणुकांचे अनुषंगाने महाराष्ट्राच्या रणांगणात पाहायला मिळतात का, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.


हे ही वाचा