मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रितपणे सामोरी जाणार आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार , काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत. जागावाटपावर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून पक्षानं अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज सादर करावेत, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांननी केलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक- 2024 लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे अर्ज 5 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रदेश कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.



आगामी काळात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी " महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार " पक्ष मोठ्या ताकदीने घटक पक्षांसहित एकत्रितपणे निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्याअनुषंगाने पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता जिल्हाध्यक्षामार्फत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज 5 सप्टेंबरपर्यंत प्रदेश कार्यालयास सादर करावयाचे आहेत. विहीत वेळेत दाखल केलेले परिपूर्ण अर्जच पक्षाची उमेदवारी निश्चित करताना विचारात घेण्यात येणार आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते प्रवेश करण्याची देखील शक्यता आहे.


महाविकास आघाडीच्या बैठका सुरु  


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेंबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत मुंबईतील जागा वाटपावर मविआच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीच्या काल झालेल्या  मुंबईतील जागावाटपा संदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. 2019 ला महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर  अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू आहे.  काही जागांवर तिन्ही पक्ष तर काही जागांवर दोन पक्ष  दावा करत आहेत.  त्यामुळे अजूनही पुढील बैठकीमध्ये  मुंबईतील जागा संदर्भात चर्चा होईल. शिवसेना ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितला आहे, अशी माहिती आहे. 




इतर बातम्या :


सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली


Atal Setu Mumbai : अटल सेतूवरील वाहतूक सुसाट! सात महिन्यांत तब्बल 50 लाख वाहनांनी केला प्रवास