Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार विरोधकांनी जाहीर केला आहे. विरोधी पक्षांनी मार्गारेट अल्वा यांची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. मार्गारेट अल्वा या गोव्याच्या राज्यपाल होत्या. त्या मूळच्या कर्नाटकातील आहेत.


विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील. 19 रोजी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या बैठकीदरम्यान टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी उमेदवाराला आतापर्यंत 17 पक्षांचा पाठिंबा आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही विरोधकांसोबत असल्याचे शिवसेनेने सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत विरोधक एकवटले आहेत.


कोण आहेत मार्गारेट अल्वा?


मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकातच शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मार्गारेट या काँग्रेस पक्षात सामील झाल्या आणि काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. काँग्रेसने त्यांना 1975 मध्ये पक्षाचे सरचिटणीसही केले. अल्वा या एकूण चार वेळा राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.


दरम्यान, शनिवारी संध्याकाळी एनडीएने देखील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा केली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत धनकड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या: