PRESIDENTIAL ELECTION 2022 : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 165 आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे 15 मिळून ही संख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना 200 चा पल्ला गाठण्यासाठी आणखी 20 आमदारांची गरज लागणार आहे. यासाठी शिंदेंची नजर विरोधी बाकावर आहे असं बोललं जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदार फोडणार का याकडं लक्ष लागलंय.. काँग्रेसचे विधानसभेत 44 तर राष्ट्रवादीचे 53 सदस्य आहेत. त्यामुळे ते 20 आमदार कोणत्या पक्षाचे असतील याबाबत चर्चा सुरु झाल्या आहे.
शिंदे यांनी जर असा दावा केला असेल तर वरील 20 मतं ते कुठून आणणार याबाबत आता चर्चा सुरु आहे. राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या एकीला एकापाठोपाठ एक सुरुंग लागत चालले आहेत. गेल्या आठवडाभरात तब्बल तीन पक्षांनी यूपीए मित्र पक्षांची साथ देत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आधी शिवसेना नंतर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आज ओम प्रकाश राजभर हे तीन पक्ष एनडीएच्या साथीला आले आहेत.
राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर होण्याआधी 2017 पेक्षा यावेळची निवडणूक भाजपसाठी जड असेल असं मानलं जात होतं. जवळपास 26 हजार मतं कमी पडत होती. पण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मु यांचं नाव एनडीएनं जाहीर केलं आणि पारडं फिरलं. कारण आदिवासी आणि त्यातही महिला उमेदवाराला विरोध करणं अनेक पक्षांसासाठी अडचणीचं ठरलं.
खरंतर विजयासाठी कमी असलेल्या मतांची भाजपनं लगेचच गोळाबेरीज केली होती. वायएसआरचे जगनमोहन रेड्डी, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक या दोघांच्याच पाठिब्यानं भाजपची चिंता दूर केली होती. पण सोबत इतर पक्षही जुळत चालल्यानं विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यातही भाजप यशस्वी ठरत आहे. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी मुंबईत होणारी महाविकास आघाडीची बैठक तर रद्द करावी लागली.
त्यामुळे आता राष्ट्रपती निवडणुकीत केवळ एनडीएच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. ही निवडणूक म्हणजे 2024 च्या दृष्टीनं विरोधकांच्या एकीची परीक्षा असणार होती. पण त्यात तूर्तास तरी विरोधक पूर्णपणे अयशस्वी झाल्याचं चित्र दिसतंय.
इतर महत्वाच्या बातम्या
Presidential Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का!
Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू नव्हे तर रामनाथ कोविंद यांनीही टाळली होती 'मातोश्री' भेट