कोल्हापूर : मान गादीला आणि मत मोदींना, कोल्हापुरात (Kolhapur) हे होणार नाही, असं वक्तव्य कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांनी केलं आहे. मान गादीला आणि मत मोदींना, हे कोल्हापुरात (Kolhapur News) शक्य नाही. कोल्हापूरचा धर्म वेगळा आहे. आता भाजपला उदयनराजेंची गरज आहे की नाही, असं म्हणताना सतेज पाटलांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.
आंबेडकरांच्या निर्णयाचं स्वागत
शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. या सगळ्याचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 25 वर्षांनी काँग्रेस चिन्हसमोरचं बटन दाबायला मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले. राज्यातील आंबेडकर यांचा निर्णय झाला नाही, त्यांनी आमच्यासोबत यावं अशी इच्छा आहे, असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
भाजपला आता उदयनराजेंची गरज नाही?
सतेज पाटील यांनी यावेळी उदयनराजेंच्या बाबतीत देखी प्रतिक्रिया दिली आहे. सतेज पाटील म्हणाले, उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही, त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल कुणाला आदर आहे, हे समोर आलं आहे. उदयनराजे यांची गरज होती, त्यावेळी घरात येऊन सन्मान केला होता, मग आता भाजपला उदयनराजे यांची गरज आहे की नाही, मला माहित नाही. पण, दिल्लीत तीन दिवस जाऊन सुद्धा उदयनराजे यांना भेट दिली जात नाही.
हे कोल्हापुरात होणार नाही
मान गादीला आणि मत मोदींना हे कोल्हापुरात होणार नाही. कोल्हापूरची माती वेगळी आहे, कोल्हापूरचा धर्म वेगळा आहे. कोल्हापुरात कोणती हवा चालत नाही. उमेदवारी जाहीर होत नाही, यावरून महायुतीत किती भांडणं आहेत ते कळतं, असंही सतेज पाटील यावेळी म्हणाले आहेत.
हातकणंगलेची जागा शिवसेनेची, राजू शेट्टींनी आमच्यासोबत लढावं
राजू शेट्टी यांच्या बाबत पुढच्या दोन दिवसात निर्णय होईल. हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे, पण आम्हाला वाटतं की राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत लढावं. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणं हे महाविकास आघाडीचा अजेंडा असेल. आमच्या विचाराचा खासदार दिल्लीत जावा, अशी आमची भूमिका आहे. सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली, असा कोणता विषय नव्हता. सांगलीत विशाल पाटील उभा राहीले तर, ते निवडून येतील. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषणा करतील, हा त्यांचा निर्णय आहे, पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असं वाटतं.
सतेज पाटील नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :