Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao Patil : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao Patil) पराभव केला होता. गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभे राहणार असून यावेळी निवडून येणार याची 100 टक्के खात्री आहे. ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल, असे शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हटले होते. यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, 2019 सालचा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढणार असतील तर एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे स्पष्ट होत आहे.
त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ
त्यांचे विधान पाहिले तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय
मनसे प्रमुख राज ठाकरे ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपा युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यावर अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणी महायुतीत जाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत. त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत दिसेल
अब की बार 400 पार म्हणणं असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील, अशी वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली, राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल परिस्थिती नाहीये. महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा