Maharashtra Politics : महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोल्हापुरात (Kolhapur) शाहू महाराजांना (Shahu Maharaj) लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मविआने कोल्हापूरची जागा काँग्रेसला देत शाह महाराजांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांचे पणतू आणि वारसदार असलेले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.


शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट


संभाजीराजे छत्रपती यांनी बाबांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ट्विटर म्हणजेच एक्स पोस्टमध्ये त्यांनी शाहू महाराजांचं अभिनंजन केलं आहे. तिकीटासाठी एकदाही मुंबई, दिल्लीला न जाता शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी तिकीट मिळाली. त्यांच्या जनसेवेमुळे त्यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?


अभिनंदन बाबा...


गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.


खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. 


कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे.


काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी जाहिर


लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shahu Maharaj in Kolhapur Loksabha : कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांनाच उमेदवारी का? ही आहेत 5 कारणे