मुंबई : महाविकास आघाडीतील पक्षांनी (MVA) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काही उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जाहीर सभांमध्ये उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. दुसरीकडे काँग्रेसची सात उमेदवारांच्या नावांची यादी देखील जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar )पक्षाची संभाव्य उमेदवारांची नावं एबीपी माझाच्या हाती आली आहेत. यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या जागांचा समावेश आहे. सातारा लोकसभेचा (Satara Lok Sabha Seat)  विचार केला असता शरद पवारांकडून माढ्याची जागा रासपचे नेते महादेव जानकर यांना दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीत माढ्याच्या जागेवरुन तिढा कायम आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात दोन संभाव्य नावं समोर आल्यानं शरद पवारांसमोर साताऱ्याचा पेच कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


साताऱ्यातून उमेदवार कोण?


महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालेलं आहे. साताऱ्यातून विद्यमान उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी केलेली आहे. मात्र, शरद पवार यांच्यासोबत पक्षातील बंडानंतर देखील राहिलेले कराड उत्तरचे आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं देखील नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत असल्यानं साताऱ्याचा तिढा कायम असल्याचं समोर आलं आहे. 


श्रीनिवास पाटील की बाळासाहेब पाटील कुणाला संधी?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) आणि बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil)  शरद पवार यांच्यासोबत राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून साताऱ्यातून श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यजीतसिंह पाटणकर, सारंग पाटील आणि सुनील माने यांची नावं चर्चेत होती. मात्र, एबीपी माझाला मिळालेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत साताऱ्याच्या जागेवर दोन जणांची नावं समोर आली आहेत. त्यामध्ये श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.


शरद पवार कुणाला संधी देणार?


शरद पवार यांची पुण्यात साताऱ्यातील लोकप्रतिनिधींसोबत दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर देखील साताऱ्याचा उमेदवार निश्चित झाला नव्हता.  साताऱ्यातील काही लोकप्रतिनिधींनी शरद पवार यांनीच साताऱ्यातून निवडणूक लढवावी, असं म्हटलं होतं.  मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी  काही जाहीर केलेलं नव्हतं. आता संभाव्य उमेदवारांच्या यादीत श्रीनिवास पाटील  आणि बाळासाहेब पाटील यापैकी शरद पवार कुणाला संधी देतात हे पाहावं लागेल. 


माढा रासपला?


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून माढा लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांचं नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे. दुसरीकडे महायुतीत अद्यापही तिढा सुटलेला नाही. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केला आहे. 


संबंधित बातम्या : 


मोठी बातमी : माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार, शरद पवारांची 9 जणांची संभाव्य सरप्राईज यादी


Nilesh Lanke: नगर दक्षिणच्या पॉलिटिकल गेममध्ये येणार ट्विस्ट, निलेश लंकेंच्या पत्नीचं सूचक वक्तव्य, म्हणाल्या...