अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अहमदनगर दक्षिण मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार उभा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नगर दक्षिणमधून पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे मविआकडून मैदानात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे. निलेश लंके हे सध्या अजित पवार गटात आहेत. परंतु, त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करतील आणि त्यांना मविआकडून उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात आहे. मात्र, आता या राजकीय समीकरणात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांनी तसे संकेत दिले आहेत. 


अहमदनगर दक्षिण लोकसभा (Nagar Dakshin constituency) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापू लागल आहे. तर भाजपकडून दुसऱ्यांदा सुजय विखे यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा अद्यापही झाली नाही. मात्र, आमदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके या दोघांचेही नाव चर्चेत आहे. तशी तयारी देखील लंके यांनी केली आहे. मात्र, आमदारकीला तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून निलेश लंके हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक असल्याचे बोलल जात आहे. त्यातच त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मी किंवा निलेश लंके या दोघांपैकी एकजण नक्की उभा राहणार आहे, असे वक्तव्य राणी लंके यांनी केले आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये निलेश लंके यांची नगर पट्ट्यातील लोकप्रियता चांगली वाढली आहे. विशेषत: त्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे निलेश लंके हे सुजय विखेंना चांगली टक्कर देऊ शकतात. 



काय आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित?


अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रीय आहे. भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. यामुळे जर लंके विरुद्ध विखे लढत झाल्यास लंके विखेंना तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा


पत्र्याचं घर, शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास