दिल्ली : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 15 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याही यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. भाजपच्या (BJP) या चौथ्या यादीत पुदूच्चेरी तसेच तमिळनाडू राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपने या यादीत तमिळनाडूतील (Tamil Nadu) प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमार (Radhika Sarathkumar) यांनादेखील तिकीट दिले आहे. त्या विरुदनगर (Virudhunagar) येथून निवडणूक लढवणार आहेत.
तिसऱ्या यादीत 9 जणांचा समावेश
याआधी भाजपने 21 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये तमिळनाडूचे भाजपचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश होता. ते कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत. तिसऱ्या यादीमध्येदेखील तामिळनाडूच्या मतदारसंघांचाच समावेश होता. भाजप हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. हा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे त्याच्या प्रत्येक जागेवरील उमेदवाराकडे लोकांचे लक्ष आहे.
दुसऱ्या यादीत 72 जणांची नावे
ज्या मतदारसंघांवर कोणताही वाद नाही किंवा मित्रपक्षांचा दावा नाही, अशाच मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा भाजपकडून केली जात आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत अशा 72 मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये पीयुष गोयल, अनुराग ठाकुर, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोरहलाल ठक्कर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावांचा समावेश होता.
2 मार्च रोजी पहिली यादी
भाजपाने 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत देशभरातील एकूण 195 मतदारसंघांचा समावेश होता. यात मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या 34 मंत्र्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे याच पहिल्या यादीत भाजपाने एकूण 28 महिला नेत्यांनाही उमेदवारी दिली होती.
महाराष्ट्रात 20 जागांवर उमेदवारांची घोषणा
भाजपने महाराष्ट्रासाठी एकूण 20 जागांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. महायुतीत काही जागांवर एकापेक्षा अधिक मित्रपक्ष दावा सांगत आहेत. त्यामुळे काही जागांसाठीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीने सर्व 48 जागांसाठी आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. महाराष्ट्रातील दिग्गज नेते नितीन गडकरी यांचे भाजपाच्या पहिल्या यादीत नाव नव्हते. महाराष्ट्रातील महायुतीतील तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दुसरी यादी जाहीर करण्यात आली तेव्हा गडकरी यांना नागपूरहून उमेदवारी देण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, फक्त 9 जणांचा समावेश