Sanjay Raut: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे.


ईडीने खुलासा केला आहे की, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते म्हणून त्यांना गुरु आशिष कंपनीत आणण्यात आले. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र असल्याने या प्रकल्पात तेही गुंतले होते. प्रवीण राऊत यांच्याकडे अधिकार होते की, ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करू शकता होते. त्यांना म्हाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम सोपविण्यात आले होते.


संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यामुळे प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी स्वतः संपर्क साधला. नंतर एफएसआय बिल्डरला विकला. याप्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचं आपसात संगनमत होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा 25 टक्के हिस्सा होता. तरीही यात प्रवीण राऊत हे फक्त एक चेहरा होते. हे सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झालं असल्याचं ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.


प्रवीण राऊत यांनी आपल्या जबाबात दावा केला आहे की, पत्राचाळचा पुनर्विकास प्रकल्प 740 कोटी रुपयांचा असून त्यांना 25 टक्के शेअर्स असल्याने सुमारे 180 कोटी रुपये मिळाले असते. यातच संजय राऊत यांना या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळाल्याचा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी अनेक मालमत्ता विकत घेतल्याचे तपासात समोर आले आहे, याशिवाय हा पैसा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरण्यात आला. संजय राऊत यांना मिळालेल्या पैशाचा (रोख) स्त्रोत प्रवीण राऊत असून त्यांना हे पैसे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनकडून मिळाले आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प केवळ 13.18 एकरचा होता आणि संजय राऊत आल्यानंतर हा प्रकल्प 47 एकरचा झाल्याचेही तपासात समोर आले असल्याचे ईडीने आपल्या आरोपत्रात म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.    


संबंधित बातमी: 


Sanjay Raut Custody : संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली