Yuva Sena: कोरोनाच्या संकटातून सावरत नाही तोच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर अतिवृष्टींचे संकट ओढवले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व वसतिगृह शुल्क माफ करण्याची मागणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी कुलगुरू डॉ. येवले यांच्याकडे केली आहे. याबाबत युवा सेनेकडून कुलगुरूंना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. 


यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा दौरा केला.  या दरम्यान त्यांना अतिवृष्टीग्रस्त काही भागांची पाहणी केली आहे. मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील परिस्थिती अत्यंत विदारक आहे.  मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या गंभीर परिस्थितीत संकटग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 आणि पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 चे शैक्षणिक शुल्क, परिक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क माफ करावे, अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे. 


औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच मराठवाडा विभागात परतीच्या पावसाने तडाखा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे उरलेसुरलेल्या खरीप पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागामध्ये जून ते जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे एकुण 8 लाख 11 हजार 845 शेतकरी बाधित झालेले असून, 5 लाख 87 हजार 466. 41 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत मराठवाडा विभागातील एकूण 450 महसूल मंडळांपैकी 207  महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यात मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्हे आणि महसूल मंडळांचाही समावेश आहे,त्यामुळे त्यांना दिलासा देण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे. 


वरुण सरदेसाईंचा मराठवाडा दौरा...


शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेनेला भगदाड पडल्याची चर्चा पाहायला मिळाली. त्यामुळे आता शिवसेनेला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे सर्वच नेते प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाला बळकट करण्यासाठी वरुण सरदेसाई मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद येथील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला.