Sanjay Raut : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ (Patra Chawl)  घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार पडली.


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असं ईडीने सांगितलं. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचं कोर्टाने म्हटलं.


संजय राऊतांवर पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आरोप


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे आज संजय राऊतांची कोठडी आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी झाली, ज्यात त्यांना कोणताही दिलासा न देता कोठडी 14 दिवसांनी वाढवण्यात आली.


संजय राऊत यांच्यावरील कारवाई द्वेषातून किंवा राजकीय सूडबुद्धीनं झालेली नसल्याचं स्पष्ट करत राऊतांचा दावा ईडीनं नाकारला आहे. संजय राऊतांनी आपल्या विश्वासू प्रवीण राऊतसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केलेलं आहे. या प्रकरणी तपास अजून सुरू असून राऊत हे राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि अशा प्रकरणात साक्षीदारांना धमकावल्याची अनेक उदाहरणं आहेत, असा दावा करत ईडीनं संजय राऊतांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.