Non-Bailable Warrant Against Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याने कोर्टाने हे वॉरंट बजावलं आहे. शिवडी दंडाधिकारी कोर्टाने ही कारवाई केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जानेवारीला होणार आहे.
मेधा सोमय्या यांच्यावतीने वकील लक्ष्मण कनल यांनी बाजू मांडली. लक्ष्मण कनल म्हणाले, "आज कोर्टात मेधा सोमय्या यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. संजय राऊत हे पूर्वी देखील या खटल्यामध्ये उपस्थित नव्हते हे आम्ही माननीय कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं आहे. त्यामुळे कोर्टाने आज संजय राऊत यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या तारखेवेळी हजर राहावं लागणार आहे. जर हजर नाही राहिले तर कोर्ट आपले अधिकार वापरेल"
वॉरंट जारी करण्याची मागणी मान्य
दरम्यान संजय राऊतांविरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी शिवडी कोर्टात केली. संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने ही मागणी करण्यात आली. या सुनावणीला किरीट आणि मेधा सोमय्या दोघंही कोर्टात हजर होते, मात्र संजय राऊत सातत्याने गैरहजर राहिले.
संजय राऊत यांनी मेधा यांच्यावर 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. याचप्रकरणात मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
जोपर्यंत वॉरंट जारी करत नाही तोपर्यंत राऊत येणार नाहीत, असा युक्तिवाद सोमय्यांच्या वकिलांनी केला. मात्र पुढील तारखेला राऊत हजर राहतील, असं राऊत यांच्या वकिलांनी कोर्टाला आश्वासन दिलं.
मेधा सोमय्या यांचा जबाब
दरम्यान, कोर्टाने आज मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवला. "संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केल्यामुळे मी राऊत यांच्या विरोधात तक्रार केली आहे. राऊत यांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना ऑनलाईनमध्ये एक लेख लिहून माझ्यावर कोट्यवधींचा शौचालय घोटाळा केल्याचा खोटा आरोप केला होता. ज्याच्यामुळे माझी बदनामी झाली.", असे मेधा सोमय्यांनी कोर्टात सांगितलं.
मेधा सोमय्या यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून मीरा-भाईंदर परिसरात 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतल्याचे लेखात म्हटले आहे. या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी 3 कोटी 90 लाखांचा घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
VIDEO : Sanjay Raut यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, मेधा सोमय्या यांच्या विनंतीनंतर कोर्टाची कारवाई
संबंधित बातमी
संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांच्याकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल