मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला असून कोर्टाची सुट्टी संपली की किरीट सोमय्या यांचे वकील याचिका कोर्टासमोर सादर करतील. 


मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 


संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे, मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


खोटी प्रसिद्धी मिळावी याकरता संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप केले. त्यामुळे आता त्यांना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफी मागावीच लागणार, त्यांना त्यांच्या पापाचे फळ मिळणार, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं.


काय आहे टॉयलेट घोटाळा?


मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरु केली आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ही 18 मार्च 2021 रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे.  


संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना त्यांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला होता. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीन देखील सरकारची आहे असेही सोमय्या यांनी सांगितलं होतं.  


इतर महत्वाच्या बातम्या


Toilet Scam: राऊतांनी सोमय्यांवर आरोप केलेला काय आहे 'टॉयलेट घोटाळा'?


लवकरच किरीट सोमय्यांचा 'टॉयलेट घोटाळा' बाहेर काढणार, संजय राऊतांचा इशारा


Kirit Somaiya : शौचालय घोटाळ्याचा आरोप; कारवाईआधीच सोमय्यांकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न