मुंबई - राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आघाडीमधील बड्या नेत्यांनी एकमताने जागावाटपाचे धोरण स्वीकारले. त्यानुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ ठरला असून काँग्रेस मधवा, तर राष्ट्रवादी धाकटा भाऊ झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, सांगलीतील जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलेच रणकंदन होत असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही सांगलीचा तिढा कायम आहे. त्यासदंर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगलीतील जागेबाबत पुन्हा एकदा खुलासा केला. तसेच, वसंत दादा पाटील यांचा दाखला देत विशाल पाटल (Vishal patil) हे आमचेच आहेत, असेही राऊत यांनी म्हटले.


मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरताना रॅलीत वातावरण चांगले होते. या रॅलीसाठी जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. मात्र, आजारी असल्याने विश्वजित कदम रॅलीला येऊ शकले नाहीत. त्यामुळे पुढील 2 दिवसांत सांगलीत विश्वजीत कदम मेळावा घेतील, त्यानंतर कॉंग्रेस पक्षही चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी कामाला लागेल, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 


राज्यात कुठेही हा माझा उमेदवार, हा त्याचा उमेदवार असे नाही, राज्यातील सर्वच 48 उमेदवार मविआचेच आहेत. विशाल पाटील समजूतदार आहेत, त्यांचा आणि माझा उत्तम संवाद आहे. विशाल पाटील यांचा डीएनए हा वसंतदादाचा आहे, असे म्हणत विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे राऊत यांनी सूचवले आहे. सांगलीत एकास एकच फाइल होईल, विशाल पाटील यांची चिंता नको, विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मनात विशाल यांच्याबद्दल प्रेम आहे, तर विशालच्या मनात शिवसेनेबद्दल प्रेम असून सांगली लोकसभा शिवसेना प्रथमच लढत आहे, असेही राऊत यांनी म्हटले. दरम्यान, विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी मोठं शक्तीप्रदर्शन करुन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, सांगलीत विशाल पाटलांचे बंड थंड करण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आहे.   


म्हणून भुजबळांची माघार


उद्धव ठाकरे यांनी जे काही फडणवीस यांच्याबदल खुलासे केलेत ते खरे आहेत. तर, नाशिकमध्ये भुजबळ निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारी बदलली आहे, असे म्हणत भुजबळांची माघार यावर राऊतांनी भाष्य केलं.  


शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष दिसणार नाही


प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, प्रकाश आंबेडकर कधी कधी खरे बोलतात. लोकसभा निवडणुकी नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही, भाजपा ढेकर देईल. राज्यात शिंदें आणि अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येत नाही. दोघांनाही आपले पक्ष विलीन करावे लागतील, असे भाकीतही राऊत यांनी केले.  


मोदींना पराभवाची भीती


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभवाची भीती आहे, त्यामुळे आता ते सभा घेत आहेत. 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या मोदींना आता निवडणुकांसाठी घाम गाळावा लागतोय. मात्र, देशात इंडिया आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील. तर, राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील,असा दावाही, राऊत यांनी केला. तर, बारामतीत सुप्रिया सुळे निवडून अधिक मताने निवडून येतील


शरद पवाराही पाठिंबा देतील


दरम्यान, उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. पण, पंतप्रधानपदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाल्यास शरद पवारही पाठिंबा देतील, असेही राऊत यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले.