Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभेची निवडणूक ही आता चौरंगी होणार हे आज आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या जाहिर सभेवरून दिसून आले. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ जाहिरसभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीनही नातू एकाच मंचावर आले. प्रकाश आंबेडकरांच्या जागी सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) होते. या सभेसाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी लोकं एकत्र आले होते. यावेळी भीमराव आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला तर, सुजात आंबेडकर यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.


दिल्लीत वसुली भाई, त्यांची बंदुक ईडी-सीबीआय


अमरावतीचे पोट्टे-पोट्टीनो जयभीम म्हणत सुजात आंबेडकरांनी भाषणाला सुरुवात केली. सुजात आंबेडकर म्हणाले, एकच निवडणूक घेणार असं जाहीरनाम्यात आहे, त्यामुळे हे घातक आहे. एक वसुली भाई यांचा दिल्लीत बसलेला आहे आणि त्यांची बंदुक आहे ईडी-सीबीआय. 


भाजपला मतदान करू नका, त्यांना पाडा म्हणजे पाडा : सुजात आंबेडकर


अमरावती सुद्धा निवडणुकीत धार्मिकवर प्रचार सुरू आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. साडी-किराणा म्हणजे रवी राणा असं लहान मुलगा सांगत होता, त्यामुळे मी विनंती करतो की, भाजपला निवडणुकीत मतदान करू नका, त्यांना पाडा म्हणजे पाडा, असं म्हणत सुजात आंबेडकरांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.


सुजात आंबेडकरांचा काँग्रेसवरही जोरदार निशाणा


सुजात आंबेडकर यांनी पुढे म्हटलं आहे की,  एनआरसीला विरोध करणारे फक्त आंबेडकर वादीच आहे. आज काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार नाही, आम्हाला काय फक्त मत द्यायला ठेवलं आहे का. आधी तुम्ही तुमचे नेते भाजपमध्ये जाण्यापासून थांबवा मग बोला की मतविभाजन बद्दल, असं म्हणत सुजात आंबेडकरांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला आहे.


भीमराव आंबेडकरांची नवनीत राणांवर टीका


भीमराव आंबेडकर म्हणाले की, आनंद झाला असेल आम्हाला बघून. सगळ्यांसमोर एकच प्रश्न असेल की, आमचं डिपॉझिट जप्त होते की काय. अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांचा विजय आजच घोषित झाला आहे. पाच वर्षांपूर्वी अपक्ष उमेदवार निवडून आले, सगळ्यांनी मतदान दिले, पण न्याय दिला का.  नाचनेवाले का क्या काम, नाचना हे तो बॉलिवूड हे ना, असं म्हणत त्यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.


आमच्या शिवाय राजकारण चालणार नाही : भीमराव आंबेडकर


आज सत्ताधारी म्हणताय की, आम्हाला संविधान बदलायचं आहे. आम्हाला 400 पार करायचा आहे, पण 150 ही पार करणार नाही. देशाचं सरकार मंदिर-मस्जिदमध्ये गुंतले आहे. महाराष्ट्रात आणि देशात आमच्या शिवाय राजकारण चालणार नाही, इथली लढाई आपण हरलो तर, भविष्य अंधारात जाईल. याच काँग्रेसने बाबासाहेबंना त्या काळात खूप त्रास दिला आहे. दोन वेळा पाडण्याचं काम केलं आहे. आता वेळ आली आहे. जर आमच्या नांदी लागला तर, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला उमेदवार सापडेना हीच परिस्थिती महाराष्ट्रात येईल. EVM विरोधात आम्ही लढतोय पण ना न्यायालय ऐकत आहे ना सरकार ऐकत आहे, असं म्हणत त्यांनी ईव्हीएम आणि सरकारवरही निशाणा साधला आहे.