(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी; संजय राऊत म्हणाले, 'लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या'
Sanjay Raut On CJIDY Chandrachud: सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का?, याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.
Sanjay Raut On CJIDY Chandrachud: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त हजेरी लावली. यावेळी नरेंद्र मोदींनी श्री गणेशाची आरती देखील केली. मात्र नरेंद्र मोदींनी धनंजय चंद्रचूड यांच्या घरी भेट दिल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत निशाणा साधला.
धनंजय चंद्रचूड (CJIDY Chandrachud) देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि पंतप्रधान गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही. पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले, त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का?, याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही?, तारखांवर तारखा का पडत आहेत? याबाबत आमच्या मनात आता शंका आहे, असं संजय राऊतांनी सांगितले.
सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो.
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2024
भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो. pic.twitter.com/5jNA0i45Zb
लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या- संजय राऊत
सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले, काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का?, असा सवालही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या, असंही संजय राऊत म्हणाले.
मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानीही भेट-
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथेही पंतप्रधानांनी गणपतीपुजेत सहभाग घेतला होता. बुधवारी पंतप्रधानांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सरन्यायाधीशांनी कुटुंबासह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींनी बाप्पाची आरती केली. यावेळी अतिशय भक्तीमय वातावरण दिसून आले.