मुंबई : महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) मुहूर्तावर संयुक्त परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त निवडला आहे. 


पत्रकार परिषदेत मविआच्या एकजुटीचं दर्शन


महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही महाविकास आघाडी एकजुटीचा प्रदर्शन करेल. आज शिवालयमध्ये 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सर्व उपस्थित राहतील. समाजवादी पार्टी, डावे पक्ष तिथे उपस्थित राहतील. ही एकजूट महाराष्ट्रात कायम राहील आणि आम्ही 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू आणि हे जाहीर करायला आजच्य शुभ देणे जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.


मविआमध्ये कोणताही वाद उरलेला नाही


साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे खरं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात साडे तीन शहाणे आपल्याला दिसत आहेत, त्या साडेतीन शहाण्यांना आव्हान  देण्यासाठी आजचा मुहूर्त आम्ही निवडला आहे. आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेत आहोत त्या अर्थी कोणताही वाद उरलेला नाही. काही असेल तर एकत्र बसून चर्चा करू, असंही राऊत म्हणाले आहेत.


साडेतीन शहाण्यांपैकी अर्धा शहाणा कोण?


महाराष्ट्राच्या राजकारणातील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धा शहाणा कोण या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, त्या अर्ध्या शहाण्याची झोप कशाला उडवताय, उद्या तुम्हाला मी नक्कीच सांगेन. हे सरकार आणि महाराष्ट्रातील त्यांचे सर्व लोक हे सर्व साडेतीन शहाणेचं आहेत. या साडेतीन शहाण्यांनीच महाराष्ट्राचं राज्य बुडवलं होतं, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर निशाण साधला आहे.


सांगली, भिंवडीचा तिढा सुटणार?


आमच्यामध्ये कोणताही वाद नाही, असं काही असेल तर आम्ही एकत्र चर्चा करू. एकत्र काम करताना काही जागांवर शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरु असते. सांगली, भिंवडीच्या जागावाटपाच्या तिढ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, सांगली, भिवंडी अनेक पक्ष लढत आले आहेत. विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे, त्याचसोबत मी भिंवडीतीव राजकीय कार्यकर्त्यांच्या भावनांशीही सहमत आहे. 


मविआची संयुक्त पत्रकार परिषद 


आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय आज जाहीर होईल. याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मविआच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.


हुकूमशाही विरोधात लढताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो


रामटेक, अमरावती, कोल्हापूर या जागा आम्ही काँग्रेससाठी सोडल्या. या जागांवरील शिवसैनिकांच्या भावनांशीही मी सहमत आहे. पण, शेवटी या देशात आपल्याला हुकूमशाही विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असं म्हणत आज जागावाटप जाहीर करणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.