Praniti Shinde vs Ram Satpute Solapur Lok Sabha :  सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला. आडम मास्तर यांच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांची ताकद वाढणार असल्याचं बोललं जातेय. यावरुन भाजप उमेदवार राम सातपुते यांनी निशाणा साधला आहे. कुणी कोठेही गेले तरी 3 हजार घरे दिलेले कामगार भाजपसोबत असतील असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला.  पंढरपूरमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी सोलापूर जिल्ह्याचा मेळावा आयोजित करून भाजपच्या दोन्ही उमेदवारांना शिवसेना पूर्ण ताकतीने मागे उभी राहील अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकसभेचे भाजपचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 कुणी कुठेही गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार कामगारांना घरे दिल्याने हे सर्व कामगार आमच्यासोबत असतील, असा टोला भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी लगावला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीसोबत आला असल्याने माजी आमदार नरसय्या आडम आमच्यासोबत असल्याचा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला होता. याला भाजप आमदार राम सातपुते यांनी उत्तर देत सोलापूर मधील कामगार , गोरगरीब वर्ग एका कामगाराच्या मुलाच्या मागेच उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. मोदीजींनी सोलापुरातील 30 हजार विडी कामगारांच्या डोक्यावर छत देण्याचा प्रयत्न केला. हे काम मोदीजींनी कोणत्या नेत्यासाठी नाही तर गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी केले होते. त्यामुळे कोण कोठे गेले तरी सोलापूरचा कष्टकरी कामगार  उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. 


सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी उजनी धरणातील गाळ आम्ही काढू आणि सोलापूरच्या कानाकोपऱ्यात पाणी पोचवू असे आश्वासन यावेळी राम सातपुते यांनी दिले. उजनी धरणातील गाळ काढल्याने धरणातील 7 टक्के पाणीसाठा वाढणार असून यामुळे सोलापूर शहरासह अक्कलकोट , दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर , मंगळवेढा , पंढरपूर तालुक्यातील दुष्काळी गावांना भरपूर पाणीपुरवठा होईल, असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला. भाजप केवळ विकासावर निवडणूक लढवत असून 400 पार गेलेले 4 जून रोजी पाहायला मिळेल असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला. 


आणखी वाचा :


प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार, ज्यांच्यासाठी मोदी सोलापुरात आले, त्या नेत्याचा काँग्रेसला पाठिंबा!