अकोला : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


ठाकरे आणि पवारांनी स्वतःमध्ये बदल करावेत


उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने (Shiv Sena) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीने (NCP Sharad Pawar Group) स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. त्यांनी अकोला येथे एबीपी माझाशी एक्स्लुसिव्ह बातचीत केली आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 


प्रकाश आंबेडकरांचा जोरदार निशाणा


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचे सामाजिकरण होणं आवश्यक असल्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल. 


महाविकास आघाडीचा विषय संपला


वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. वंचित आणि मविआच्या अनेक बैठका, चर्चासत्रे निष्फळ ठरली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केलं आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर चिन्ह


अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.


Akola Prakash Ambedkar Election Symbol : पाहा व्हिडीओ : अकोला लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांना 'प्रेशर कुकर' चिन्ह



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Election Symbol : प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर,  महादेव जानकरांना शिट्टी, लोकसभेसाठी कुणाला कोणतं चिन्हं?