Sanjay Raut : शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Operation Tiger : शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाआधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली. तर या बातमीला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील दुजोरा दिला. लवकरच खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. आता ऑपरेशन टायगरवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल. पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झालेले आहे. ते अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी आमचे सर्व खासदार उपस्थित होते. ते आकडा चुकीचा सांगताय. सहा आकडा चुकीचा सांगताय, त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा सांगितला पाहिजे. ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतले पाहिजे. त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स
संजय राऊत पुढे म्हणाले की, यांचं कसलं ऑपरेशन टायगर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज त्यांचे ऑपरेशन करत आहे. रोज त्यांचा अपमान होत आहे. शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाचा पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. आमचे ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या, असा टोला त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला.
अमेरिकेने भारताचा कायदा हाती घेतला
दरम्यान, अमेरिकेतून भारतात रवानगी करण्यात आलेल्या 104 भारतीयांचा प्रवासादरम्यान छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत बेकायदा आश्रय घेतलेल्या भारतीयांची पहिली तुकडी अमेरिकेतून पाठविण्यात आली. भारतीयांच्या हाता-पायात बेड्या घालून त्यांना फरफटत नेल्याचे व्हिडीओतून पुढे आले आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, अमेरिकेने भारतीयांना जी वागणूक दिली आहे त्याचे पडसाद काल संसदेत उमटले. अल कायदाचे अतेरिकी आहेत, अशी त्यांनी वागणूक देण्यात आली. हातात पायात बेड्या घालून त्यांना आणले. भारताच्या हद्दीत आणल्यावर त्यांना बेड्या घातल्या होत्या. जगाला अमेरिकेने दाखवलं की भारताची काय किंमत आहे. घुसखोरीच कोणीच समर्थन करणार नाही, पण माणुसकी नावाची गोष्ट असते. भारतीयांना नोटीस, समन्स बजावले असते तर बरे झाले असते. बाकी देशांनी आपापली विमाने अमेरिकेत पाठवली होती. भारताचा तमाशा जगाने पाहिला. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर काल अमेरिकेची वकिली राज्यसभेत करत होते. मोदी ट्रम्प यांना भेटायला आता चालले आहेत. त्या भेटीत मोदी हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का? हे आम्ही काल त्यांना विचारलं. भारतीयांच्या बेड्या काढल्या नाही हे भारतीय कायद्याचं उल्लंघन आहे. अमेरिकेने भारताचा कायदा हाती घेतला, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
