Sanjay Raut on Raj Thackeray and Devendra Fadnavis : राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीत कोणत्या विषयावर चर्चा? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, महाराष्ट्रात सध्या...
Sanjay Raut on Raj Thackeray and Devendra Fadnavis Meeting : काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाली होती. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत संजय राऊतांनी मोठा दावा केलाय.

Sanjay Raut on Raj Thackeray and Devendra Fadnavis Meeting : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय घडामोडींना चांगलीच गती मिळाली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली. या भेटीनंतर, मनसे-शिवसेना युतीला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे, असा दावा केला आहे. रोखठोकमध्ये म्हटले आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी वांद्र्यातील 'ताज' हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीत मराठी माणसांच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फी असण्याची शक्यता आहे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू
फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जमिनी अदानी समूहाला देण्यात आल्या. त्यामुळे मुंबईला कमकुवत करून सर्व संपत्ती गुजरातला नेण्याचा डाव आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस यांना या भेटीत विचारला असावा, अशी आशा आहे. मोदी व शाह यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे इतकेच, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
मनपातील प्रशासक काळात कमिशनमधून 34 हजार कोटींची कमाई
दरम्यान, चार वर्षे मुंबई पालिकेवर लोकप्रतिनिधींचे राज्य नाही. मुख्यमंत्र्यांना ‘रिपोर्टिंग’ करणारा प्रशासक तेथे आहे. या काळात कमिशनबाजीतून 34 हजार कोटी रुपये संबंधितांच्या खासगी तिजोरीत गेले. यातला किती वाटा फडणवीस व किती शिंदे यांना मिळाला तो आकडा समजला म्हणजे जनता राज्यकर्त्यांच्या कर्तबगारीवर फुले उधळायला मोकळी. मुंबईतून 34 हजारांवर कोटींची कमाई केली. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे कोणती महानगरपालिका किती कोटींना लुटली हे समजून घेणे रंजक आहे. या देशात जो काळा पैसा निर्माण होतो त्याचे प्रमुख केंद्र मुंबई आहे.
दर तासाला देशात पावणेदोनशे कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण होतो. तो सर्व 365 दिवस होतो. त्यात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. आता तर भाजपने गौतम अदानी यांची वरातच मुंबईत आणली व त्यांना संपूर्ण मुंबई आंदण दिली. अदानी त्यांच्या लुटीचा वाटा या राज्यकर्त्यांना देणार. त्यामुळे सगळेच खूश. या पैशांची पूजा करण्यासाठी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात महाराष्ट्राचे मंत्री जातील. प्रशासकाच्या काळात मुंबई महानगरपालिकेची लूट झाली. धारावी विकासाच्या नावाखाली गौतम अदानी यांना मुंबईतील अनेक मोक्याचे भूखंड फडणवीस यांनी दिले. धारावीचा भूखंड माहीम, माटुंगा, दादरच्या जवळ आहे. त्याशिवाय कुर्ला डेअरी, दहिसर टोल नाका, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, मिठागरे अशा जमिनींचा मलिदादेखील धारावी विकासाच्या नावाखाली अदानी यांना दिला जात आहे. ही महाराष्ट्राची लूट आहे व ती उघडपणे सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे.
आणखी वाचा






















