Baramati : भोरच्या मावळ्यांनी ठरवलं तर काहीच असाध्य नाही; अजितदादांना इशारा, संग्राम थोपटेंनी सुप्रियाताईंसाठी दंड थोपटले
Sangram Thopate : काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा देत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.
पुणे : ज्या ज्या वेळी आपल्याकडे परकीय आक्रमणं झाली त्यावेळी इथल्या मावळ्यांनी एक वज्रमुठीनं ती परतावली आहेत, आताही भोरच्या मावळ्यांनी ठरवलं तर काहीच असाध्य नसतं असं सांगत काँग्रेसच्या संग्राम थोपटेंनी (Sangram Thopate) सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला. शरद पवारांनी (Supriya Sule) भोरमधून बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksbha Election) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्या विजयासाठी आता काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे सरसावल्याचं दिसून येतंय.
संग्राम थोपटे सुप्रिया सुळेंसोबत
ज्या बहिणीला आतापर्यंत निवडून आणले तिलाच चितपट करण्याचा विडा उचललेल्या अजित पवारांना धोबीपछाड करण्यासाठी शरद पवारांनी बारामतीमध्ये पहिला डाव टाकला आणि मोठं गणित जमवून आणलं. शरद पवारांनी त्यांचे गेल्या 40 वर्षांपासून असलेले विरोधक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंचे वजन आता सुप्रिया सुळेंच्या पारड्यात पडणार हे नक्की झालंय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काहीशा बॅकफुटला गेलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठी ही गोष्ट दिलासा देणारी ठरणार आहे.
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज भोर या ठिकाणी ‘महासभा एकनिष्ठेची, भव्य शेतकरी मेळावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं नियोजन हे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. याच सभेच्या स्टेजवरून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी बोलताना संग्राम थोपटे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. तसेच भोर, वेल्हे आणि मावळ तालुक्याच्या कार्यकर्त्यांचे सुप्रियाताई सुळे यांना पूर्ण समर्थन असल्याचं सांगितलं.
काय म्हणाले संग्राम थोपटे?
आज जे काही लोक विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत गेले आहेत असं सांगण्यात येतंय, मला त्यांना विचारायचं आहे की मागचे काही वर्षे विकास होत होता म्हणून तुम्ही सुप्रिया ताईंसोबत होतात का? भोरच्या मावळ्यांनी ठरवलं तर कोणत्याच गोष्टी असाध्य नसतात. ज्या ज्या वेळेला इथे परकीय अतिक्रमणं झाली त्या त्या वेळेला या ठिकाणच्या मावळ्यांनी एक वज्रमुठ ठेऊन ही अतिक्रिमणं परतवली आहेत.
'राहिले ते मावळे आणि उडाले ते कावळे' ही संकल्पना माझ्या वडिलांनी मांडली होती. आज ती लागू पडेल अशी परिस्थिती आहे. तुतारी ही शिवछत्रपतींच्या काळापासून चालत आलेली आहे. आपल्याला तुतारी वाजवण्याऱ्या माणसापुढे बटन दाबून चौथ्यांदा लोकसभेमध्ये ताईंना पाठवायचं आहे.
ही बातमी वाचा: