मुंबई : निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप हाच उत्तम पर्याय असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलंय. 'मराठा मार्ग' या मराठा सेवा संघाच्या मासिकात एक लेख लिहून पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडलीय. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलेल्या या मताची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून यावर भाजप काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेला 32 वर्ष झाली आहेत. तब्बल 32 वर्षांनंतर आता संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या राजकारणात उतरायचं ठरवलं आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या लेखातून संघटनेच्या कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना केली आहे. आपल्या या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलंय की, आता राजकीय सत्ता मिळवण्याची वेळ आली असून त्यासाठी कोणत्याही पक्षाशी युती करावी लागली तरी चालेल, कारण सत्ता मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व क्षम्य असतात.
आगामी निवडणुकांसाठी भाजप हाच युती करण्यासाठी उत्तम पर्याय असल्याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय. संभाजी ब्रिगेडची सामाजिक आणि राजकीय भूमिका ही नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात राहिली आहे. त्यामुळे आता पुरषोत्तम खेडेकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
महत्वाचं म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या 15 वर्षे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. त्यामुळे खेडेकर यांची सामाजिक भूमिका आणि वैयक्तीक भूमिका यात मोठा विरोधाभास दिसून येतोय. अनेक मुद्यांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात असली तरी भाजपसोबत त्यांचा नेहमीच घरोबा राहिलाय.
मधल्या काळात संभाजी ब्रिगेडमध्ये फुट पडली. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेडच्या एका गटाने राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलं तर प्रवीण गायकवाड यांच्यासोबत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या दुसऱ्या गटाने सामाजिक संघटना म्हणून काम करायचं ठरवलं.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाला युती करण्यासाठी दिलेल्या या निमंत्रणाला कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणं महत्त्वाचं असेल.
संबंधित बातम्या :